शौर्य पुरस्कार विजेत्याला अखेर छत्रछाया
By Admin | Published: September 15, 2015 01:34 AM2015-09-15T01:34:27+5:302015-09-15T01:34:27+5:30
दीड महिन्यांपूर्वीपर्यंत रस्त्यावर राहणारा दिल्ली बॉम्बस्फोट मालिकेतील महत्त्वाचा साक्षीदार आणि राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्राप्त तरुण राहुल काळे उपेक्षा अखेर थांबली आहे.
- प्रमोद गवळी, नवी दिल्ली
दीड महिन्यांपूर्वीपर्यंत रस्त्यावर राहणारा दिल्ली बॉम्बस्फोट मालिकेतील महत्त्वाचा साक्षीदार आणि राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्राप्त तरुण राहुल काळे उपेक्षा अखेर थांबली आहे. नोबेल पुरस्कारप्राप्त कैलाश सत्यार्थी यांच्या ‘बचपन बचाओ आंदोलन’ या संस्थेने त्याला आश्रय दिला आहे. हिंगोलीचे खासदार राजीव सातव त्याला दरमहा वरखर्चसाठी तीन हजार रुपये देत आहेत.
गेल्या मार्च महिन्यात राहुलला
१८ वर्षे पूर्ण झाल्याने बालगृह
सोडावे लागले होते. तेव्हापासून
तो आपल्या मातापित्यांसह कनॉट प्लेस येथील हनुमान मंदिर परिसरात दिवस कंठत होता. ‘लोकमत’ने सर्वप्रथम ३० जून रोजी याकडे लक्ष वेधले होते.
‘बचपन बचाओ’ आंदोलनाच्या कार्यकर्त्यांना राहुलच्या परिस्थितीची कल्पना येताच ते त्याला आपल्या सोबत घेऊन गेले. तूर्तास बुराडी क्षेत्रातील मुक्ती आश्रमात त्याची राहण्याची सोय करण्यात आली असून कैलाश सत्यार्थी फाऊंडेशन त्याचा खर्च करीत आहे.
‘बचपन बचाओ’चे धनंजय टिंगल यांनी सांगितले की, ‘आम्हाला राहुलची माहिती मिळाली तेव्हा त्याची मुक्ती आश्रमात राहण्याची व्यवस्था केली. शिक्षण पूर्ण करून नोकरी लागेपर्यंत तो तिथे राहू शकतो. राहुल हा दिल्ली बॉम्बस्फोट मालिकेतील महत्त्वाचा साक्षीदार असून त्याला पोलीस संरक्षण आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल अधिक माहिती देता येणार नाही.’
राहुलचे वडील बजरंग काळे हे मूळ सोलापूर जिल्ह्णातील मोहोळ तालुक्यातील आहेत. १९७२ च्या भीषण दुष्काळामुळे ते दिल्लीला आले आणि तेव्हापासून झोपडपट्टीत राहात होते.
पंतप्रधान, मुख्यमंत्री मदत करू शकले असते -सातव
राहुलच्या मदतीसाठी मी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. परंतु प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी मीच दर महिन्याला तीन हजार रुपये देण्याचे ठरविले. तसे धनादेशही त्याला दिले, असे खा. राजीव सातव यांनी सांगितले.
राहुलला हवे घर
- माझे आईवडील आजही रस्त्यावर राहतात. खेळणी विकून उदरनिर्वाह करतात. अर्थात मंदिराकडून त्यांची जेवणाची सोय केली जाते. इ.स. २००२ पर्यंत आम्ही मोतिया खान झोपडपट्टीत राहात होतो. तेथून हटविल्यावर रोहिणीमध्ये आम्हाला घर मिळणार होते. माझ्या वडिलांनी (बजरंग काळे) दहा हजार रुपये जमाही केले होते.
परंतु पावती हरवल्याने अद्याप घर मिळालेले नाही. आईवडील दोघेही साठीच्या घरात आहेत. अशात त्यांच्या राहण्याची व्यवस्था झाली तर समाधान वाटेल, अशी कळकळीची विनंती राहुलने केली आहे.
राहुलने केली होती पोलिसांना मदत
- राहुल हा १३ सप्टेंबर २००८ ला दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेला महत्त्वाचा साक्षीदार आहे. त्याच्या सांगण्यावरूनच आरोपींची रेखाचित्रे काढण्यात आली होती आणि चार जिवंत बॉम्ब जप्त करण्यातही त्याने पोलिसांना मदत केली होती. या धाडसाबद्दल राहुलला २००९ साली राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.