अखेर सैफुल्लाचा खात्मा
By admin | Published: March 9, 2017 12:41 AM2017-03-09T00:41:20+5:302017-03-09T00:41:20+5:30
इस्लामिक स्टेट आॅफ इराक अॅण्ड सिरियाचा (इसिस) संशयित दहशतवादी सैफुल्ला तब्बल १२ तासांच्या कारवाईनंतर एका घरात मारला गेला. येथून जवळ असलेल्या घरात
लखनऊ : इस्लामिक स्टेट आॅफ इराक अॅण्ड सिरियाचा (इसिस) संशयित दहशतवादी सैफुल्ला तब्बल १२ तासांच्या कारवाईनंतर एका घरात मारला गेला. येथून जवळ असलेल्या घरात चाललेल्या या कारवाईत त्याला जिवंत पकडण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. पोलिसांसोबत सैफुल्लाच्या झालेल्या चकमकीत तो मारला गेला. भोपाळ-उज्जैन पॅसेंजर रेल्वेत मंगळवारी झालेल्या बॉम्बस्फोटाशी त्याचा संबंध असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ज्या घरात तो होता त्याचे दार १२ तासांनंतर पहाटे साडेतीनच्या सुमारात फोडले असता तो त्याच्याजवळील शस्त्रांसह मृतावस्थेत आढळला.
महासंचालक (एटीएस) असीम अरुण म्हणाले की, सैफुल्लाला जिवंत पकडण्याचे प्रयत्न करण्यात आले. परंतु त्यात यश आले नाही. तो बाहेर यावा म्हणून आम्ही अश्रुधुराची नळकांडी व चिली बॉम्ब फोडले. परंतु तो बाहेर आला नाही. त्याला निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर एटीएसच्या कमांडोंजनी त्या घरात धडक दिली. त्याने एटीएस कमांडोज्वर गोळ्या झाडल्या. त्याला एटीएस कमांडोज्नी चोख प्रतिउत्तर दिले. त्यानंतर दोन खोल्यांची संपूर्ण तपासणी करून शोध घेतला गेला व सैफुल्ला मृतावस्थेत आढळला. सैफुल्ला हा इसिसच्या खोरासान गटाशी सक्रिय संबंधित असल्याचे दिसले. त्याच्यावर इसिसचा प्रभाव आहे की नाही हा चौकशीचा भाग आहे. कमांडोज्ला सैफुल्लाच्या पोटाभोवती वायर गुंडाळलेले होते. ती स्फोटके असावीत असा संशय आहे.
मृतदेह स्वीकारण्यास वडिलांचा नकार
- माझा मुलगा देशद्रोही असू शकत नाही, असे सांगून सैफुल्लाचे वडील सरताज यांनी त्याचा मृतदेह स्वीकारण्यास बुधवारी नकार दिला. एक देशद्रोही माझ्याशी संबंधित असू शकत नाही. मग तो माझा मुलगा का असेना, असे उद्गार सरताज यांनी काढले. आम्ही भारतीय नागरिक आहोत. माझा जन्म येथे झाला. माझ्या पूर्वजांचा जन्मही इथलाच आहे. आपला मुलगा चकमकीत मारला गेल्याचे बुधवारी सकाळी मला कळाले होते, असे ते म्हणाले.
- ‘नोकरी-पाणी शोधत नाहीस, माझे ऐकत नाहीस,’ असे म्हणून मी त्याला मारहाण केली होती. त्यामुळे अडीच महिन्यांपूर्वी तो घर सोडून निघून गेला होता. सोमवारी सकाळी त्याचा मला दूरध्वनी आला. सौदीला जाण्यासाठी मला व्हिसा मिळाला असून, मी तेथे जाण्याची तयारी करीत आहे, असे त्याने सांगितले. मी त्याला हो म्हणालो, असे ते म्हणाले.
दोघे नव्हे एकच!
त्या घरात दोन दहशतवादी असल्याची चर्चा होती, असे विचारल्यावर असीम अरुण म्हणाले की, ‘‘त्यामुळे आम्ही तपशील निश्चित करून घेण्यासाठी ट्यूब कॅमेरेज वापरले परंतु चित्र स्पष्ट दिसत नव्हते. आणि दोन दहशतवाद्यांनी घराचा ताबा घेतला असावा असे दिसत होते. परंतु शोध आणि स्वच्छतेचे काम करण्यात आल्यानंतर फक्त एकच मृतदेह आढळला. तेथून पिस्तूल, रिव्हॉल्व्हर, चाकू व दारूगोळा ताब्यात घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
विविध ठिकाणी छापे
ठाकूरगंज येथील घरात सैफुल्लासह तीन तरुण राहत होते. रेल्वे बॉम्बस्फोटानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांच्या चौकशीनंतर कानपूर, ओरय्या आणि लखनऊ येथे छापे घालण्यात आले. यामध्ये संशयितांकडे लॅपटॉप आढळला असून, त्यात इसिसशी संबंधित साहित्यही होते. इंटरनेटवरूनच त्यांनी बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतले होते. आणखी दोघांना ताब्यात घेणे बाकी असल्याचेही दलजित चौधरी यांनी सांगितले.