अखेर कर्नाटकात कुमारस्वामी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; दोन मंत्र्यांनी घेतली शपथ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 03:41 PM2019-06-14T15:41:09+5:302019-06-14T15:41:53+5:30
कर्नाटकमध्ये कुमारस्वामी यांना पाठिंबा देत काँग्रेसने 34 पैकी 22 मंत्रिपदे पदरात पाडून घेतली होती.
बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न काही संपायचे नाव घेत नव्हते. मात्र, कुमारस्वामी यांनी मंत्रीमंडळ विस्तार करत याला पूर्णविराम दिला आहे. जेडीएसच्या दोन आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
एच नागेश आणि आर शंकर यांना आज राज्यपाल विजुभाई वाला यांनी गोपनियतेची शपथ दिली. कर्नाटकमध्ये कुमारस्वामी यांना पाठिंबा देत काँग्रेसने 34 पैकी 22 मंत्रिपदे पदरात पाडून घेतली होती. तर जेडीएसच्या वाट्याला मुख्यमंत्री पद आणि 12 मंत्रिपदे आली होती. या दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या करारानुसार तीन रिक्त असलेल्या पदांपैकी दोन मंत्रिपदे जेडीएसच्या वाट्याला आली होती. यामुळे आज कुमारस्वामी यांनी दोन मंत्र्यांना संधी दिली.
Karnataka: R Shankar & H Nagesh take oath as state cabinet ministers at Rajbhavan in Bengaluru. pic.twitter.com/leCQrZeneq
— ANI (@ANI) June 14, 2019
कुमारस्वामी सरकारचा विस्तार आधी 12 जूनला करण्यात येत होता. मात्र, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक गिरीश कर्नाड यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा राजकीय शोक पाळण्यात आला होता. यामुळे आज कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला.
कुमारस्वामी मुख्यमंत्री व्हायच्या आधीपासून भाजपकडून त्यांचे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न झाले होते. येडीयुराप्पा यांनी काँग्रेस, जेडीएसचे आमदार फोडायचा प्रयत्न केला होता. तसेच मंत्रिमंडळातील समावेशावरून काँग्रेसचे काही नेतेही नाराज होते. लोकसभेच्या निकालानंतर त्यांचे सरकार कोसऴणार असे भाकितही येडींनी केले होते. मात्र, वरिष्ठांचे आदेश आल्याने येडींनी तलवार म्यान केली आहे.