अखेर इफ्फीमध्ये ज्युरींसमोर होणार एस. दुर्गाचे स्क्रीनिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 09:30 AM2017-11-27T09:30:51+5:302017-11-27T11:44:47+5:30
मागच्या आठवडयात केरळ उच्च न्यायालयाने 'एस दुर्गा' चित्रपटाच्या स्क्रीनिंगला हिरवा कंदिल दाखवला होता.
पणजी - वादाच्या भोव-यात सापडलेल्या एस. दुर्गा चित्रपटाचे अखेर इफ्फीमध्ये स्क्रीनिंग होणार आहे. आज संध्याकाळी खास ज्युरींना हा चित्रपट दाखवण्यात येईल. न्यूज 18 ने हे वृत्त दिले आहे. गोव्यात ४८ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरु होण्याआधीच एस.दुर्गा आणि न्यूड या दोन चित्रपटांच्या स्क्रीनिंगवरुन मोठा वाद झाला होता.
मागच्या आठवडयात केरळ उच्च न्यायालयाने 'एस. दुर्गा' चित्रपटाच्या स्क्रीनिंगला हिरवा कंदिल दाखवला होता. उच्च न्यायालयाने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आयोजकांना इफ्फीमध्ये 'एस दुर्गा'चा समावेश करुन या चित्रपटाचे स्क्रीनिंग करण्याचे निर्देश दिले होते. न्यायमूर्ती के.विनोद चंद्रन यांनी 'एस. दुर्गा' च्या स्क्रीनिंगवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने घेतलेले आक्षेप फेटाळून लावले. सनल कुमार शशीधरन यांनी एस दुर्गा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
दिग्दर्शक सनल शशिधरन गोव्यात दाखल झाल्यानंतर हा चित्रपट दाखवण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. इफ्फी संचालकांकडे या चित्रपटाचे सेन्सार प्रमाणपत्रही सादर करण्यात आले आहे. एस. दुर्गा हा तमिळ चित्रपट आहे. एस. दुर्गा चित्रपट महोत्सवात दाखविल्यास याद राखा, असा सज्जड दम गोव्यातील स्वयंसेवी संघटनेने दिला आहे.
दरम्यान, हिंदूच्या भावना दुखावतील असा कोणताही चित्रपट प्रदर्शित करु देणार नाही, हा चित्रपट इफ्फीत दाखविल्यास याद राखा, असा सज्जड दम गोव्यातील राष्ट्रप्रेमी नागरिक या संघटनेने दिला आहे. या संघटनेच्या पदाधिका-यांनी इफ्फीचे संचालक सुनीत टंडन यांना पाठविलेल्या पत्रात हा चित्रपट महोत्सवात न दाखविण्याचा इशारा दिला आहे. भावना दुखावणारे शीर्षक जरी बदलले असले तरीही चित्रपटात हिंदूंना वंदनीय असलेल्या दुर्गादेवीला जळत्या निखा-यावरुन चालताना दाखविल्याचा आरोप संघटनेने केला आहे. हा चित्रपट प्रदर्शित केल्यास इफ्फीला त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराही संघटनेने दिला आहे.