Nirbhaya Case: अखेर न्याय झाला! निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना पहाटे तिहार कारागृहात फाशी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 05:32 AM2020-03-20T05:32:43+5:302020-03-20T08:16:48+5:30
16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत एका तरुणीवर सहा जणांनी सामुहिक बलात्कार करून तिला गंभीर जखमी केले होते. त्यानंतर या तरुणीचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता.
नवी दिल्ली - संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या दिल्ली बलात्कारकांडातील चार आरोपींना आज पहाटे तिहार कारागृहात फासावर लटकवण्यात आले. पहाटे साडेपाच वाजता जल्लादाने खटका ओढला आणि चारही आरोपींना फासावर लटकवले आणि गेल्या सव्वासात वर्षांपासून न्यायाची वाट पाहत असलेल्या दिल्लीतीत निर्भयाला न्याय मिळाला.
गुन्हेगारांच्या वकिलांनी आपल्या अशिलांची फाशी वाचवण्यासाठी विविध कायदेशीर पर्यांय वापरून शिक्षेची अंमलबजावणी टाळण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले. मात्र त्यांचे सर्व युक्तिवाद फेटाळून लावत सुरुवातीला दिल्ली उच्च न्यायालयाने आणि अखेरच्या क्षणी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला. अखेरीस पहाटे साडेपाच वाजता ठराविक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पवन जल्लाद यांनी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार खटका ओढला आणि विनय शर्मा, अक्षय सिंह ठाकूर, मुकेश कुमार सिंह आणि पवन गुप्ता या चारही आरोपींना फासावर लटकवले.
Tihar Director General Sandeep Goel: All four convicts (2012 Delhi gang-rape case) were hanged at 5:30 am. https://t.co/Bqv7RG8DtOpic.twitter.com/JFFdL3reF0
— ANI (@ANI) March 20, 2020
16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत एका तरुणीवर सहा जणांनी सामुहिक बलात्कार करून तिला गंभीर जखमी केले होते. त्यानंतर या तरुणीचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता. देशाच्या राजधानीत झालेल्या या क्रूर प्रकारामुळे संपूर्ण देश हादरला होता. तसेच सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर या प्रकरणातील सहा आरोपींविरोधात न्यायालयीन लढा सुरू झाला होता. त्यात एक आरोपी अल्पवयीन निघाल्याने त्याची सुटका झाली होती. उर्वरित आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, एका आरोपीने कारागृहातच आत्महत्या केली होती.
त्यानंतर निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषी आरोपींनी विविध कायदेशीर पर्याय वापरून बरीच वर्षे आपली फाशी टाळली होती. पतियाळा हाऊस, दिल्ली उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रपतींकडे दया याचिका असे सर्व पर्याय वापरूनही या गुन्हेगारांना दिलासा मिळाला नाही. त्यानंतरही विविध कायदेशीर पर्याय वापरून या गुन्हेगारांनी फाशीला हुलकावणी दिली. सर्व पर्याय संपून फाशी निश्चित झाल्यानंतर चारही गुन्हेगारांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयातही धाव घेऊन पाहिली.
संबंधित बातम्या
दोषींच्या वकिलांची अखेरची 'सर्वोच्च' चालही निष्फळ, निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना पहाटे लटकवणार फासावर
निर्भया बलात्कार प्रकरण : चारवेळा डेथ वॉरंट निघालेला देशातील एकमेव खटला
निर्भया अत्याचार: दोषींनी केली कोरोनाची 'ढाल'; न्यायालयात खेळली नवी चाल
Nirbhaya Case: 'आम्हाला फासावर लटकवून देशातील बलात्कार थांबणार नाहीत पण...'
अखेरीस 19 मार्च रोजी सकाळपासून आरोपींच्या वकिलांनी पतियाळा हाऊस, दिल्ली उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय असे सर्व कायदेशीर पर्याय वापरले. मात्र न्यायदेवतेने या सर्व गुन्हेगारांना अखेरच्या क्षणी कुठलाही दिलासा दिला नाही.