अखेर कावेरीचं पाणी तामिळनाडूला सोडण्यास कर्नाटक तयार
By admin | Published: October 3, 2016 10:59 PM2016-10-03T22:59:58+5:302016-10-03T22:59:58+5:30
कर्नाटक सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तामिळनाडूला पाणी सोडण्यास तयार झालं
ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 3 - कावेरीच्या पाण्यावरून कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये रंगलेल्या शीतयुद्धाला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे पूर्णविराम मिळाला असं वाटत असतानाच कर्नाटक सरकारनं हे पाणी सोडण्यास विरोध दर्शवला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तामिळनाडूला पाणी सोडण्याचा निर्णय कर्नाटक सरकार मानायला तयार नव्हते.
मात्र आता कर्नाटक सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तामिळनाडूला पाणी सोडण्यास तयार झालं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विशेष अधिवेशनात याची घोषणा केली. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कर्नाटकातील शेतीसाठी 6 हजार क्युसेक्स पाणी सोडल्यास त्यातील 3 हजार क्युसेक्स पाणी तामिळनाडूला आपोआप पोहोचणार असल्याची माहिती दिली आहे.
कावेरीतून सोडण्यात येणारे पाणी फक्त पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापरता येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. मात्र तामिळनाडूनं कर्नाटकच्या या निर्णयाला कठोर म्हटलं आहे.