अखेर हमीभाव समितीला निवडणूक आयोगाची मंजुरी, कृषिमंत्री तोमर यांची राज्यसभेत माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 06:02 AM2022-02-05T06:02:44+5:302022-02-05T06:03:40+5:30
MSP News: शेती उत्पादनांना किमान हमीभाव (एमएसपी) देण्यासंदर्भात समिती गठित करण्यासाठी निवडणूक आयोगाने संमती दिली आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर ही समिती गठित करण्यात येईल
नवी दिल्ली : शेती उत्पादनांना किमान हमीभाव (एमएसपी) देण्यासंदर्भात समिती गठित करण्यासाठी निवडणूक आयोगाने संमती दिली आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर ही समिती गठित करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शुक्रवारी राज्यसभेत दिली.
यासंदर्भात समाजवादी पार्टीचे खासदार चौधरी सुखराम सिंग यांनी प्रश्न विचारला होता. एक वर्षाच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर एमएसपीसाठी कायदा तयार करण्याची तयारी सरकारने दर्शविली होती. यासाठी समिती गठित करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, ही समिती गठित झालेली नसल्याचे मंत्र्यांच्या उत्तराने स्पष्ट झाले आहे. आयोगाने निवडणुकीनंतर ही समिती गठित करावी, असे निर्देश दिल्याने निवडणुकीनंतर समिती गठित केली जाईल, असे तोमर यांनी स्पष्ट केले.
सोशल मीडियावर नियंत्रण आवश्यक
सोशल मीडियावरून मुले, महिला व समाजात दुही निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न होत असल्याने यावर नियंत्रण आणण्यास केंद्र सरकार कटिबद्ध असल्याची माहिती केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. यासंदर्भात शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांनी पूरक प्रश्न विचारला होता.