अखेर व्ही.के.सिंग यांनी मागितली माफी!
By admin | Published: April 12, 2015 01:12 AM2015-04-12T01:12:35+5:302015-04-12T01:12:35+5:30
माध्यमांना ‘प्रेस्टिट्यूट’ असे संबोधून वाद ओढवून घेणारे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी अखेर शनिवारी आपल्या या वक्तव्याबद्दल क्षमा मागितली.
नवी दिल्ली : माध्यमांना ‘प्रेस्टिट्यूट’ असे संबोधून वाद ओढवून घेणारे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी अखेर शनिवारी आपल्या या वक्तव्याबद्दल क्षमा मागितली. आपल्याविरुद्ध हेतुपुरस्सर मोहीम राबविणाऱ्या मूठभर पत्रकारांना वगळून इतर सर्वांची मी माफी मागतो, असे ते म्हणाले.
‘पूर्वग्रहदूषित व पक्षपाती वागणाऱ्या ‘प्रेस्टिट्यूट’कडून (प्रसारमाध्यमे) तुम्ही काय अपेक्षा करणार’असे टिष्ट्वट त्यांनी अलिकडेच केले होते. प्रेस्टिट्यूट हा शब्द प्रॉस्टिट्यूट (वेश्या) या शब्दात सुरुवातीचे अक्षर बदलून तयार केला आहे. या वक्तव्यामुळे त्यांना प्रखर टीकेचा सामना करावा लागला. मी माध्यमातील सर्वच लोकांसाठी हा शब्द वापरला नव्हता, असे सिंग म्हणाले. मी फक्त १० टक्के पत्रकारांबद्दलच असे बोललो होतो व ते त्याच लायकीचे आहेत. परंतु त्यामुळे या क्षेत्रातील ९० टक्के लोकांची मने दुखावली असतील तर याची मला खंत आहे,असे सिंग यांनी येथे वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)