अखेर याकूबला फासावर लटकवले
By admin | Published: July 30, 2015 07:13 AM2015-07-30T07:13:22+5:302015-07-30T13:33:15+5:30
मुंबईत मार्च १९९३ मध्ये भीषण बॉम्बस्फोट घडवून निरपराधांचे बळी घेतल्याबद्दल याकूब मेमनला अखेर आज सकाळी फासावर लटकवण्यात आले.
Next
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ३० - मुंबईत मार्च १९९३ मध्ये भीषण बॉम्बस्फोट घडवून २५७ निरपराध नागरिकांचे बळी घेतल्याबद्दल याकूब मेमन याला अखेर आज सकाळी फासावर लटकवण्यात आले. नियोजित वेळेच्या काही काळ आधीच याकूबला नागपूर मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली. याकूबच्या फाशीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी ११ वाजता विधानसभेत अधिकृत निवेदन देणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने काल याकूबचा दयेचा अर्ज फेटाळला, त्यानंतर रात्री १०.३० च्या सुमारास राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही त्याचा दयाअर्ज फेटाळून लावला. दयेचा अर्ज फेटाळल्यापासून प्रत्यक्ष फाशीपर्यंत किमान १४ दिवसांचा अवधी असायला हवा, या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून काही तरी आदेश घेण्याची याकूबच्या वकिलांची धडपड रात्री उशिरापर्यंत सुरु होती. त्यानंतर ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्यासह अनेक वकील सरन्यायाधीशांच्या घरी जाऊन एक बैठक घेतली. यानंतर तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर पहाटे सव्वा तीनच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयात याकूबच्या दयेचा अर्जावर सुनावणी करण्यात आली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा दयेचा अर्ज फेटाऴला आणि याकूबची शिक्षा टाळण्याचे शेवटच्या क्षणापर्यंत केलेले सर्वच प्रयत्न निष्फळ ठरले. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली की सर्वोच्च न्यायालयात रात्री उशिरा सुनावणी करण्यात आली.
फाशीचे झाले व्हिडीओ रेकॉर्डिंग
नागपूर कारागृहात सकाळी साडेसहाच्या सुमारास याकूब मेमनला फासावर लटकवण्यात आले, त्यावेळी त्याच्या फाशीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. याकूबला फाशी देताना प्रशासनातील सहा अधिकारी तसेच डॉक्टरांची टीम उपस्थित होती. सकाळी सातच्या सुमारास त्याला मृत घोषित करण्यात आले. याकूबचे शवविच्छेदन कारागृहातच करण्यात आले असून, त्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. याकूबच्या फाशीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी अकरा वाजता अधिकृत निवेदन देणार आहेत.