भारताच्या अंतरिम सरकारमधील अर्थमंत्री नंतर झाले पाकिस्तानचे पंतप्रधान; कोण माहीत आहे का?
By जयदीप दाभोळकर | Published: January 31, 2021 01:54 PM2021-01-31T13:54:40+5:302021-01-31T13:58:31+5:30
१९४६ मध्ये भारतात स्थापन झालं होतं अंतरिम सरकार
अर्थमंत्री निर्मला सीतारामन या २०२१-२२ चा अर्थसंकल्प उद्या म्हणजेच १ फेब्रुवारी रोजी मांडणार आहेत. कोरोनाच्या महासाथीचं संकट आणि त्यांनंतर त्याचे अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम यामुळे यावेळचा अर्थसंकल्प अधिक महत्त्वाचा मानला जात आहे. अर्थसंकल्पात सरकारद्वारे केला जाणारा खर्च तसंच अर्थव्यवस्थेला मजबूत करणाऱ्या घोषणाही केल्या जाण्याची शक्यता आहे. पण भारताला स्वांतत्र्य मिळण्यापूर्वीही देशात पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली एक अंतरिम सरकार स्थापन करण्यात आलं होतं. यातील अर्थमंत्री हे नंतर पाकिस्तानचे पंतप्रधानही झाले होते.
स्वांतंत्र्यापूर्वी देशात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करण्यात आलं होतं. यामध्ये काँग्रेस आणि मुस्लीम लीगच्या नेत्यांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये काँग्रेसकडून जवाहरलाल नेहरू यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय तसंच माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची जबाबदारी सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे तर कृषी आणि अन्न राजेंद्र प्रसाद, शिक्षण आणि उद्योग सी. राजगोपालचारी, संरक्षण बलदेव सिंग, रेल्वे असफ अली, खाणी आणि ऊर्जा मंत्रालयाची जबाबदारी सी.एच.भाभा यांच्याकडे सोपवण्यात आली होती. तर मुस्लीम लीगच्या इब्राहिम इस्माईल यांच्याकडे वाणिज्य, लियाकत अली खान यांच्याकडे अर्थ मंत्रालय, घझनफर अली खान यांच्याकडे आरोग्य, जोगेंद्र नाथ मंडल यांच्याकडे कायदा आणि अब्दुल रब निश्तर यांच्याकडे बंदरे मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
मुस्लीम लीगकडून लियाकत अली यांना प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्याक आलं होतं आणि अंतरिम सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते. २ फेब्रुवारी १९४६ रोजी अंतरिम सरकारचे अर्थमंत्री लियाकत अली खान यांनी अर्थमंत्री म्हणू लेजिलेस्टिव्ह असेंबली भवन म्हणजेच विद्यमान संसद भवनात आपला अर्थसंकल्प सादर केला होता. तात्कालिन अर्थमंत्र्यांना त्या अर्थसंकल्पाला 'पूअरमॅन बजेट' असं म्हटलं होतं. तसंच यातील प्रस्तावांना 'सोशलिस्ट बजेट' देखील म्हणण्यात आलं होतं. परंतु अनेक उद्योगांच्या पसंतील हा अर्थसंकल्प उतरला नव्हता आणि त्यांच्याकडून यावर टीकाही करण्यात आली होती.
विभाजनानंतर लियाकत अली खान गेले पाकिस्तानात
१९४७ मध्ये १४-१५ ऑगस्टच्या मध्यरात्री देशाचं विभाजन झालं आणि त्यानंतर लियाकत अली खान हे पाकिस्तानात गेले. लियाकत अली खान हे मुस्लीम लीगचे मोठे नेते मानले जात आणि ते मोहम्मद अली जिन्ना यांचे निकटवर्तीयही होते. स्वातंत्र्यापूर्वी लियाकत अली खान हे अंतरिम भारत सरकारचे अर्थमंत्री राहिले आणि पाकिस्तानात गेल्यानंतर ते पाकिस्तानचे पंतप्रधानही बनले. विभाजनापूर्वी ते उत्तर प्रदेशातील मेरठ आणि मुजफ्फरनगरमधून निवडणूक लढवत होते. त्यांचा जन्म फाळणीपूर्वीच्या भारतातील पंजाबमधील करनालमध्ये झाला होता.