2000 रुपयांच्या नोटा बंद होणार?; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितलं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 09:27 PM2020-02-26T21:27:23+5:302020-02-26T21:46:47+5:30
बँकांना एटीएममध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा न टाकण्याची सूचना करण्याच्या वृत्तावर वित्तमंत्री निर्मला सीतारामण यांनीसुद्धा सूचक विधान केलं आहे.
नवी दिल्लीः नोटाबंदीनंतर अनेकांना पैशांचा तुटवडा जाणवला होता. त्यानंतर मोदी सरकारनं पुन्हा 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा बाजारात उपलब्ध करून दिल्या. आता त्यातील 2000च्या नोटा बंद होणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. बँकांना एटीएममध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा न टाकण्याची सूचना करण्याच्या वृत्तावर वित्तमंत्री निर्मला सीतारामण यांनीसुद्धा सूचक विधान केलं आहे. बँकांना अशा प्रकारची कोणतीही सूचना देण्यात आलेली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
बँका एटीएममध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलून त्यांच्या जागी 500 रुपयांच्या नोटा टाकत असल्याची माहिती समोर आली होती. बिजनेस स्टँडर्डनं याची माहिती दिल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. 2000च्या नोटा बंद होणार असल्याच्या चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. देशातील जवळपास 2 लाख 40 हजार एटीएममध्ये 2000च्या जागी 500 नोटा टाकण्याचा हा बदल करावा लागणार आहे.
Finance Minister Nirmala Sitharaman on reports of instruction to banks to stop putting Rs 2,000 notes in ATM: As far as I know, no such instruction has been given to banks. https://t.co/P9rWUn4ox2pic.twitter.com/rNoezQ44qK
— ANI (@ANI) February 26, 2020
एटीएममध्ये साधारणतः 2000, 500, 200 आणि 100 च्या नोटा उपलब्ध आहेत. यात बदल केल्यानंतर 2000च्या नोटा मिळणार नाहीत. गेल्या वर्षीपासून 500च्या नोटांनी व्यवहार करण्याचं प्रमाण वाढलं असून, 2000च्या नोटा कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. परंतु 2000च्या नोटा थेट बंद करण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. तर दुसरीकडे 500 रुपयांच्या नोटा वाढवत हळूहळू 2000च्या नोटा चलनातून हद्दपार करण्याचाही मोदी सरकारच्या विचाराधीन असल्याची चर्चा आहे. तसेच काही बँकांनी ग्राहकांना 1 मार्चपासून एटीएममधून 2000च्या नोटा येणार असल्याचे सूतोवाच केले आहेत.