Budget 2020: सलाम! वडिलांचं निधन होऊनही अधिकाऱ्यानं पूर्ण केलं बजेटचं काम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 10:58 AM2020-02-01T10:58:50+5:302020-02-01T11:01:14+5:30
अर्थ मंत्रालयातील अधिकाऱ्याची कर्तव्यनिष्ठा
नवी दिल्ली: काही व्यक्ती कामाला अतिशय प्राधान्य देतात. आधी काम आणि नंतर बाकी सगळं, अशी त्यांची मानसिकता असते. शेंडी तुटो वा पारंबी धेय्य गाठायचे म्हणजे गाठायचे अशा अतिशय समर्पित भावनेनं काम या व्यक्ती काम करतात. त्यामुळे त्यांच्या हातून घडणारं कामदेखील अनन्यसाधारण असतं. अशाच एका व्यक्तीचं अर्थ मंत्रालयानं कौतुक केलं आहे.
अर्थ मंत्रालयानं ट्विट करून कुलदीप कुमार शर्मा यांनी दाखवलेल्या कामावरील निष्ठेची तोंडभरुन स्तुती केली आहे. शर्मा अर्थ मंत्रालयाच्या छपाई विभागात उपव्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. शर्मा अर्थसंकल्पाच्या छपाईच्या कामात व्यस्त असताना २६ जानेवारीला त्यांच्या वडिलांचं निधन झालं. मात्र तरीही त्यांनी आपलं काम सुरुच ठेवलं. अर्थसंकल्पाच्या छपाईचं काम सुरू असताना त्यामध्ये सहभागी असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बाहेर जाण्याची परवानगी नसते. अर्थसंकल्प संसदेत सादर झाल्यानंतरच त्यांना बाहेर पडता येतं.
अर्थ मंत्रालयानं कुलदीप कुमार शर्मा यांच्या कामाप्रती असलेल्या निष्ठेचं ट्विटरवर कौतुक केलं आहे. 'आम्हाला हे कळवताना अतिशय दु:ख होतंय की छपाई विभागाचे उपव्यवस्थापक श्री कुलदीप कुमार शर्मा यांच्या वडिलांचं २६ जानेवारी २०२० रोजी निधन झालं. मात्र अर्थसंकल्पाचं काम करत असल्यानं त्यांना बाहेर जाणं शक्य नव्हतं. आपले वडील गमावूनही शर्मा एक मिनिटदेखील छपाई विभागाच्या बाहेर गेले नाहीत,' अशा शब्दांत अर्थ मंत्रालयानं शर्मा यांच्या समर्पित भावनेची मुक्तकंठानं प्रशंसा केली आहे.
Informing with regret that Shri Kuldeep Kumar Sharma, Dy Manager (Press), lost his father on 26 Jan,2020. Being on budget duty, he was on job in the lock-in. In spite of his immense loss, Sharma decided not to leave press area even for a minute. @nsitharamanoffc@Anurag_Office
— Ministry of Finance (@FinMinIndia) January 30, 2020
थोड्याच वेळात अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. यानंतर कुलदीप यांना बाहेर पडता येईल. अर्थसंकल्प निर्मितीची प्रक्रिया साधारणत: सप्टेंबरपासून सुरू होते. ही प्रक्रिया जवळपास सहा महिने चालते. तर अर्थसंकल्पाच्या छपाईचं काम हलवा सेरेमनीनंतर सुरू होतं. हलवा सेरेमनी झाल्यानंतर अर्थसंकल्पाशी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी अर्थ मंत्रालयातच राहतात. त्यांना बाहेर पडण्याची परवानगी नसते.