वित्त सचिव अधिया महिनाअखेरीस होणार निवृत्त; कॅबिनेट सचिवपद न मिळाल्याने सरकारवर होते नाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 05:39 AM2018-11-18T05:39:58+5:302018-11-18T05:41:29+5:30
केंद्रीय वित्त सचिव हसमुख अधिया हे या महिनाअखेरीस निवृत्त होणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने शनिवारी अचानकपणे केली.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : केंद्रीय वित्त सचिव हसमुख अधिया हे या महिनाअखेरीस निवृत्त होणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने शनिवारी अचानकपणे केली.
केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या ब्लॉगवर यासंबंधी लिहिले की, ‘अधिया यांनी काळ्या पैशांविरोधातील मोहीम तसेच जीएसटी यासारख्या पुढाकारांत उत्तम काम केले आहे. त्यांच्या अनुभवाचा काही पर्यायी जबाबदाऱ्यांसाठी उपयोग करून घेण्याची सरकारची इच्छा होती. तथापि, त्यांनी मला या महिन्याच्या सुरुवातीलाच सांगितले की, ३० नोव्हेंबर २०१८ नंतर एक दिवसही ते काम करू इच्छित नाहीत. आपला वेळ ते आता आपल्या आवडीच्या गोष्टी आणि मुलगा यांनाच देऊ इच्छितात. मी त्यांना निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.’
सरकार व रिझर्व्ह बँक यांच्यातील संघर्षात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल यांनी राजीनामा दिलाच, तर अधिया यांना गव्हर्नरपदी बसविले जाईल, असे बोलले जात होते. मंगळवारी रिझर्व्ह बँकेच्या संपूर्ण बोर्डाची बैठक होत असतानाच दोघांतील संघर्ष निवळला आहे.
नेमके काय झाले?
जून महिन्यात कॅबिनेट सचिवपद रिक्त झाले तेव्हा हे आपल्याला मिळेल, अशी अधिया यांची अपेक्षा होती. कारण ते सर्वांत ज्येष्ठ अधिकारी होते. तथापि, सरकारने त्यांना हे पद दिले नाही. त्यामुळे ते सरकारवर नाराज आहेत. विशेष म्हणजे अधिया हे पंतप्रधान मोदी यांचे जवळचे अधिकारी समजले जातात. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हापासून ते त्यांच्यासोबत काम करीत आहेत.