आर्थिक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणार
By admin | Published: March 11, 2017 12:07 AM2017-03-11T00:07:51+5:302017-03-11T00:07:51+5:30
आर्थिक गुन्हे करून देशाबाहेर पळून जाणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यास सरकार उपाय करीत असल्याचे केंद्र सरकारने शुक्रवारी लोकसभेत सांगितले.
नवी दिल्ली : आर्थिक गुन्हे करून देशाबाहेर पळून जाणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यास सरकार उपाय करीत असल्याचे केंद्र सरकारने शुक्रवारी लोकसभेत सांगितले. त्यासाठी अनेक देशांसोबत प्रत्यार्पण करार करण्याच्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले.
शुन्य प्रहरात विचारण्यात आलेल्या एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात जेटली यांनी सांगितले की, देशाबाहेर पळालेल्या आर्थिक गुन्ह्यांतील आरोपींना देशात परत आणण्यासाठी जास्तीत जास्त देशांसोबत प्रत्यार्पण करार करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. प्रत्यार्पणाची प्रक्रिया जटील आहे. त्यासाठी भरपूर वेळ लागतो. तरीही आर्थिक गुन्हेगारांना देशात परत आणण्याचा हाच एक पर्याय आहे. काही देश प्रत्यार्पणाची प्रक्रिया झटपट पूर्ण करण्यात सहकार्यही करतात. तृणमूलचे खासदार सौगाता रॉय यांनी नाव न घेता यासंबंधीचा प्रश्न उपस्थित केला. आयपीएल मॅन आणि किंगफिशर मॅन यांना भारतात परत आणण्यासाठी सरकारने काय पावले उचलली, अशी विचारणा रॉय यांनी केली होती.