राहुल गांधींना शोधून आणा आणि बक्षीस मिळवा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2017 08:37 AM2017-08-08T08:37:43+5:302017-08-08T08:40:05+5:30
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचं लोकसभा क्षेत्र असलेल्या अमेठी भागात राहुल गांधी बेपत्ता असल्याचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.
अमेठी, दि. 8- काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचं लोकसभा क्षेत्र असलेल्या अमेठी भागात राहुल गांधी बेपत्ता असल्याचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. राहुल गांधी यांना शोधून आणणाऱ्यांना बक्षीस मिळणार असल्याचंही या पोस्टर्समध्ये नमूद करण्यात आलं आहे. अमेठीमधील काँग्रेस कार्यालयाच्या समोरच हे पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टरवर लिहिलं आहे,'माननीय खासदार राहुल गांधी अमेठीमधून बेपत्ता आहेत. ज्यामुळे खासदाराकडून केली जाणारी विकास कामं यांच्या कार्यकाळात ठप्प आहेत. राहुल गांधी यांच्या या व्यवहारामुळे अमेठीच्या लोकांच्या मनात अपमानित भावना निर्माण झाली आहे'. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गेली सहा महिने अमेठीमध्ये हजेरी लावली नसल्याने तेथिल लोकांनी असे पोस्टर्स लावल्याची चर्चा सुरू झाली आहे.
आरएसएस आणि भाजपाच्या लोकांकडून राहुल गांधी यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. राहुल गांधी राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत म्हणून ते प्रत्येक वेळी अमेठीमध्ये उपस्थित राहू शकत नाही, असं प्रदेश काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष योगेन्द्र मिक्षा यांना सांगितलं आहे.
काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातमधील पूर स्थितीच पाहणी केली होती. त्या दरम्यान राहुल गांधी यांच्या कारवर हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर राहुल गांधी यांनी आरएसएस आणि भाजपावर आरोप केले होते. या सर्व प्रकार आरएसएस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घडवून आणल्याची थेट टीका त्यांनी केली होती. या संपूर्ण प्रकारानंतर अमेठीमध्ये राहुल गांधी बेपत्ता असल्याची पोस्टर्स लावल्याने, हा प्रकार आरएसएस आणि भाजपाची लोक करत असल्याची टीका प्रदेश काँग्रेस कमिटीने केली आहे. गुजरात दौऱ्याच्या आधी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील पूरग्रस्त लोकांशी बातचीत केली होती.
राहुल गांधींवर हल्ला करणारा भाजप नेता अटकेत
गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कारवर दगडफेक करणाऱ्या भाजपच्या स्थानिक नेत्याला पोलिसांनी अटक केली. शनिवारी धनेरामधून त्या स्थानिक नेत्याला अटक करण्यात आली. जयेश दर्जी असं या नेत्याचं नाव असून तो बनासकांठाचा भाजपचा जिल्हा महामंत्री आहे. दर्जी हा या घटनेतील मुख्य आरोपी असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. राहुल गांधींच्या कारवरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी शनिवारी देशभरात ठिकठिकाणी निदर्शनं केली.