तोडगा काढा, अन्यथा मोठा फटका; व्यापारी संघटनांचा सरकारला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 06:22 AM2020-12-16T06:22:45+5:302020-12-16T06:57:07+5:30
गेल्या २० दिवसांमध्ये ५ हजार कोटींचा व्यापार प्रभावित झाला असल्याची माहिती व्यापारी संघटना कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट)ने दिली.
नवी दिल्ली : दिल्लीकडे येणाऱ्या मालवाहतुकीपैकी जवळपास ४० टक्के वाहतूक शेतकरी आंदोलनामुळे प्रभावित झाली आहे. दिल्ली आणि एनसीआर व्यापारावर त्याचा प्रतिकूल प्रभाव पडला असून, गेल्या २० दिवसांमध्ये ५ हजार कोटींचा व्यापार प्रभावित झाला असल्याची माहिती व्यापारी संघटना कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट)ने दिली.
शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी त्यामुळे केंद्र सरकारसोबत चर्चा करून तोडगा काढावा, तसेच सरकारने खुल्या मनाने शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेत तात्काळ निर्णय घेण्याची विनंती संघटनेकडून करण्यात आली आहे. आंदोलन पुढेही असेच सुरू राहिले तर, व्यापारी, मालवाहतूकदार तसेच इतर वर्गांना व्यापारात मोठे नुकसान सहन करावे लागेल. कोरोनामुळे आधीच व्यापार प्रभावित झाला आहे. कोरोनाच्या संकटाला तोंड देत असतानाच दिवाळीनंतर व्यापार हळूहळू पूर्वपदावर येण्याची चिन्हे दिसत होती; परंतु शेतकरी आंदोलनामुळे पुन्हा एकदा व्यापाऱ्यांवर संकट कोसळले आहे.
शेतकरी आंदोलनामुळे मोठा आर्थिक फटका बसत असल्याचा दावा असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (असोचेम)कडून करण्यात आला आहे.
पंजाब, हिमाचल प्रदेश, हरयाणालाही फटका
आंदोलनामुळे पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचे दररोज ३,५०० कोटींचे नुकसान होत आहे.
आंदोलनामुळे या राज्यातील परस्पर जोडल्या गेलेल्या अर्थव्यवस्थांना मोठा धक्का बसला आहे. या राज्यांतील अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहेत.