संरक्षणमंत्री पदासाठी योग्य व्यक्तीचा शोध

By admin | Published: May 4, 2017 03:33 AM2017-05-04T03:33:57+5:302017-05-04T03:34:03+5:30

सीमेपलीकडून सातत्याने निर्माण होत असलेल्या धोक्याचा विचार करून देशाला पूर्णवेळ संरक्षणमंत्री द्यावा, यासाठी विरोधी पक्षांचा दबाव

Finding the right person for the post of Defense Minister | संरक्षणमंत्री पदासाठी योग्य व्यक्तीचा शोध

संरक्षणमंत्री पदासाठी योग्य व्यक्तीचा शोध

Next

हरिश गुप्ता / नवी दिल्ली
सीमेपलीकडून सातत्याने निर्माण होत असलेल्या धोक्याचा विचार करून देशाला पूर्णवेळ संरक्षणमंत्री द्यावा, यासाठी विरोधी पक्षांचा दबाव वाढत असला तरी अरुण जेटली यांना अतिरिक्त पदभारातून मुक्त करून नवीन संरक्षणमंत्री शोधणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कठीण होत आहे.
काश्मीर खोऱ्यातील स्थिती आणि पाकिस्तानच्या निर्दयी सैनिकांनी भारतीय जवानांच्या मृतदेहाची केलेली घोर विटंबना, या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी अरुण जेटली यांनी पंतप्रधानांची भेट घेतली; तेव्हा पूर्णवेळ संरक्षणमंत्र्यांचा मुद्दा उपस्थित झाला. काश्मीर खोऱ्यातील स्थितीच्या पार्श्वभूमीवर जेटली यांना जपानचा दौरा दोन दिवस लांबणीवर टाकावा लागला. संरक्षण खात्याच्या अतिरिक्त जबाबदारीतून शक्यतो लवकर मुक्त करा, अशी विनंती जेटली यांनी केल्याचे समजते. या महत्त्वाच्या पदासाठी योग्य व्यक्ती मिळेपर्यंत तुम्हालाच अतिरिक्त पदभार सांभाळावा लागेल, असे मोदी यांनी यावेळी सांगितल्याचे कळते. दबावाखाली आणि घाईघाईत मंत्रिमंडळात फेरबदलाची मोदी यांची तयारी नाही.
मनोहर पर्रीकर यांना अचानक मुख्यमंत्री म्हणून गोव्यात पाठविण्यात आले, हेच पूर्णवेळ संरक्षणमंत्री नियुक्त न करण्यामागचे कारण होय.
पंतप्रधान, भाजप अध्यक्ष अमित शहा, अरुण जेटली, राजानाथसिंह, नितीन गडकरी आणि एम. व्यंकय्या नायडू यांचा समावेश असलेल्या भाजपच्या उच्चाधिकार गाभा समितीच्या बैठकीतही या मुद्यावर चर्चा करण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले. मे २०१४ मध्ये जेटली यांच्याकडे संरक्षण मंत्रालयासह दुहेरी पदभार देण्यात आला होता, तशीच स्थिती पुन्हा निर्माण झाली आहे, असे मोदी या बैठकीत म्हणाल्याचे सांगण्यात येते. पुन्हा दिल्लीत बोलावून संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी हाती घ्या, यासाठी मनोहर पर्रीकर यांना राजी करणेही कठीण आहे. तुम्ही या पदासाठी नाव सुचवा, असे पंतप्रधानांनी गाभा समितीच्या सदस्यांना सांगितले. कारण पुढील दीड वर्षात विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने भाजपशासित राज्यांच्या एकाही मुख्यमंत्र्याला दिल्लीत बोलावणे शक्य नाही.
रेल्वमंत्री सुरेश प्रभू यांना संरक्षणमंत्री करून नितीन गडकरी यांच्याकडे रेल्वेचा अतिरिक्त पदभार द्यावा, असा प्रस्ताव विचाराधीन आहे; परंतु एकाकडील दुहेरी पदभार दुसऱ्या मंत्र्याकडे सोपविण्यातून मूळ हेतू साध्य होणार नाही, असाही मतप्रवाह आहे.
दुसरे असे की, मोदी हे केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल करण्यास इच्छुक आहेत. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा त्यांचा बेत दिसतो. राज्यातून दिल्लीत कोणाला संधी द्यायची, यासाठी ते नवीन चेहऱ्यांचा शोध घेत आहेत. यासाठीच पुढील ९० दिवस अमित शहा हे राज्यांच्या दौऱ्यावर आहेत.
पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील खासदारांना असे सांगितले होते की, सुशासन म्हणजेच किमान शासन होय, असे स्पष्ट सांगत त्यांनी आटोपशीर मंत्रिमंडळाचे संकेत दिले होते. त्यामुळेच नवीन संरक्षणमंत्री शोधणे महत्प्रयासाचे काम ठरत आहे.

प्रभू यांचे नाव पुन्हा चर्चेत

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना संरक्षणमंत्री करून नितीन गडकरी यांच्याकडे रेल्वेचा अतिरिक्त पदभार द्यावा, असा प्रस्ताव विचाराधीन आहे; परंतु एकाकडील दुहेरी पदभार दुसऱ्या मंत्र्याकडे सोपविण्यातून मूळ हेतू साध्य होणार नाही, असाही मतप्रवाह आहे.

Web Title: Finding the right person for the post of Defense Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.