मणिपुरातील आर्थिक नाकेबंदी संपवू - मोदी
By admin | Published: February 25, 2017 11:46 PM2017-02-25T23:46:50+5:302017-02-25T23:46:50+5:30
मणिपुरात भाजपा सत्तेत आल्यास सध्या सुरू असलेली आर्थिक नाकेबंदी संपविण्यात येईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
इंफाळ : मणिपुरात भाजपा सत्तेत आल्यास सध्या सुरू असलेली आर्थिक नाकेबंदी संपविण्यात येईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. काँग्रेसने १५ वर्षांच्या जे केले नाही, ते भाजपा १५ महिन्यांत करून दाखवील, असेही मोदी म्हणाले.
मणिपुरातही प्रचारासाठी मोदी यांनी येथे एक सभा घेतली. त्याप्रसंगी त्यांनी सांगितले की, राज्याचे मुख्यमंत्री इबोबी सिंह यांचे सरकार आतापर्यंतचे सर्वांत भ्रष्ट सरकार आहे. हे सरकार १0 टक्क्यांपर्यंत कमिशन खात आहे. काँग्रेसमुळे मणिपूरचा विकास ठप्प झाला आहे. नोकऱ्या, पायाभूत सेवा, पिण्याचे पाणी देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे.
मोदी म्हणाले की, इबोबी सरकार नागा समझोत्याबाबत खोटी मोहीत चालवित आहे. लोकांची दिशाभूल केली जात आहे. नागा समझोत्यात मणिपुरी लोकांच्या हितांच्या विरोधात एक ओळही नाही. हा समझोता दीड वर्षांपूर्वी झाला आहे. तेव्हा आपण काय करीत होतात? गाढ झोपला होतात का?
युनायटेड नागा कौन्सिलच्या वतीने नोव्हेंबरमध्ये आर्थिक नाकेबंदी आंदोलन सुरू आहे. त्याबाबत मोदी म्हणाले की, जीवनाश्यक वस्तूंची उपलब्धता करून देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. तथापि, येथे लोकांना औषधी आणि अन्य आवश्यक वस्तू मिळेनाशा झाल्या आहेत. त्याला काँग्रेस सरकारच जबाबदार आहे. (वृत्तसंस्था)
बंदने स्वागत : मोदी दाखल झाले असतानाच सहा बंडखोर गटांच्या आवाहनामुळे मणिपूर बंद होते. राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. मोदी यांचे इम्फाळमध्ये आगमन झाले. कडक बंदोबस्तामुळे संपूर्ण शहराला लष्करी छावणीचे स्वरूप आले होते. रस्त्यावर फारच थोडी वाहने दिसून येत होती. सर्व दुकाने बंद होती.