मॉब लिन्चिंग प्रकरणी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणाऱ्या 50 सेलिब्रिटींविरोधात एफआयआर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 08:51 AM2019-10-05T08:51:30+5:302019-10-05T08:57:40+5:30
पंतप्रधानांची प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप
नवी दिल्ली: मॉब लिन्चिंग विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिणाऱ्या 50 सेलिब्रिटींविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यामध्ये रामचंद्र गुहा, मणीरत्नम, अनुराग कश्यप, अपर्णा सेन यांच्यासारख्या ख्यातनाम व्यक्तीमत्त्वांचा समावेश आहे. या व्यक्तींनी मॉब लिन्चिंगबद्दल चिंता व्यक्त करत मोदींना खुलं पत्र लिहिलं होतं.
मॉब लिन्चिंग प्रकरणात सेलिब्रिटींनी मोदींना खुलं पत्र लिहिल्यानंतर बिहारच्या मुझफ्फरपूरमधील वकील सुधीर कुमार ओझा यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर मुख्य न्यायदंडाधिकारी सूर्यकांत तिवारी यांनी निकाल देत एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले. मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी २० ऑगस्टला या प्रकरणी आदेश दिल्याचं ओझा यांनी सांगितलं. ओझा यांनी त्यांच्या याचिकेत पंतप्रधानांना पत्र लिहिणाऱ्या ५० व्यक्तींच्या नावाचा उल्लेख केला होता.
सेलिब्रिटींनी लिहिलेल्या पत्रातून देशाची प्रतिमा मलीन करण्याचा आणि पंतप्रधान मोदींच्या कामाला कमी लेखण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलमांतर्गत एफआयआर दाखल केला आहे. यामध्ये देशद्रोह, सार्वजनिक शांतता भंग करण्याचा आणि धार्मिक भावना दुखावण्याच्या कलमांचा समावेश आहे.
बॉलिवूडमधील अनेक प्रथितयश कलाकारांनी जुलैमध्ये पंतप्रधान मोदींना खुलं पत्र लिहिलं होतं. देशात वाढत चाललेल्या मॉब लिन्चिंगच्या घटना रोखण्याचं आवाहन या पत्रातून करण्यात आलं होतं. अशा घटना रोखण्यासाठी कठोर कायदे करण्याची आणि आरोपींना शिक्षा देण्याची मागणी पत्रातून करण्यात आली होती. पंतप्रधानांनी मॉब लिन्चिंगच्या घटनांचा केवळ निषेध करुन चालणार नाही. तर त्यांनी या प्रकरणात कारवाई करायला हवी, असं सेलिब्रिटींनी पत्रात म्हटलं होतं.