फिक्कीमधील मोदींच्या भाषणाविरोधात गुन्हा दाखल करा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 10:53 PM2017-12-13T22:53:57+5:302017-12-13T22:54:15+5:30
नवी दिल्ली- गुजरात निवडणुकीच्या दुस-या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाआधीच काँग्रेसच्या नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांना निवडणूक आयोगानं नोटीस पाठवल्यानं काँग्रेस पक्ष बिथरला आहे.
नवी दिल्ली- गुजरात निवडणुकीच्या दुस-या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाआधीच काँग्रेसच्या नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांना निवडणूक आयोगानं नोटीस पाठवल्यानं काँग्रेस पक्ष बिथरला आहे. त्यामुळे काँग्रेसनंही भाजपावर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसनं पलटवार करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्या विरोधात आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्याचं एफआयआर केलं आहे.
निवडणूक आयोगानं काँग्रेसला नोटीस पाठवल्यानंतर अहमद पटेल, आनंद शर्मा, रणदीप सुरजेवाल्यांसह अनेक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि गुजरात अध्यक्ष जीतू वाघानी यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. निवडणूक आयोगानं अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याची मुस्कटदाबी करत चॅनेल्सविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्यांनी एक प्रकारे आचारसंहितेचाच भंग केला आहे, निवडणूक आयोगावर असा आरोप काँग्रेसनं केला आहे.
राहुल गांधी यांच्या प्रसारित झालेल्या मुलाखतींमुळे आचारसंहितेचा भंग झाला असल्याचे सांगत निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. तसेच या नोटिशीला 18 डिसेंबरपर्यंत उत्तर देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. तसेच ही मुलाखत प्रसारित करणाऱ्या स्थानिक गुजराती वाहिन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेशही निवडणूक आयोगाने दिले आहेत. राहुल गांधी यांची मुलाखत काही गुजराती वाहिन्यांवरून प्रसारित झाली होती. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने राहुल गांधी यांच्या मुलाखती प्रसारित करण्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानंतर या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांना 18 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या प्रकरणी आपली बाजू मांडण्याची मुदत देण्यात आली आहे. या काळात त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा विचार निवडणूक आयोगाकडून करण्यात येऊ शकतो.