Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी छापेमारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 12:09 PM2024-11-25T12:09:13+5:302024-11-25T12:10:03+5:30
Sambhal Violence : संभलमध्ये शाही जामा मशिदीचा सर्व्हे होत असताना रविवारी हिंसाचार झाला होता. यावेळी संतप्त जमावाने वाहनांची जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला, तसेच पोलिसांवर दगडफेक केली.
UP Sambhal Jama Masjid Violence : उत्तर प्रदेशातील संभलमधील शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी सपा खासदार जिया उर रहमान बर्क आणि स्थानिक आमदाराचा मुलगा सोहेल इक्बाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सपा खासदारावर सुनियोजित पद्धतीने हिंसाचार भडकवण्याचा, लोकांना गोळा करून त्यांना चिथावणी देण्याचा आरोप आहे.
संभलमध्ये शाही जामा मशिदीचा सर्व्हे होत असताना रविवारी हिंसाचार झाला होता. यावेळी संतप्त जमावाने वाहनांची जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला, तसेच पोलिसांवर दगडफेक केली. यात उपजिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यासह २० जण जखमी झाले आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्जही केला.
संभलमध्ये उसळलेल्या हिंसाचारात चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये नईम, बिलाल अन्सारी, नौमान आणि मोहम्मद कैफ अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. नौमान आणि बिलाल अन्सारी यांच्यावर रात्री ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. या हिंसाचाराबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. संभळमध्ये पोलिसांच्या गोळीबारात ४ तरुणांचा मृत्यू झाल्याचा आरोप करणारा व्हिडिओही एका खासगी संस्थेने आयोगाला पाठवला आहे.
दरम्यान, संभल परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. यासह परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये कोणत्याही बाहेरील व्यक्ती, सामाजिक संस्था किंवा लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांच्या आदेशाशिवाय परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी ३० नोव्हेंबरपर्यंत लागू करण्यात आली आहे. तसेच, संभल आणि परिसरातील शाळाही आज बंद ठेवण्यात आल्या आहेत.
काय आहे हे प्रकरण?
कैलादेवी मंदिराचे महंत ऋषिराज गिरी महाराज यांनी दावा केला होता की, संभलची शाही मशीद हीच हरिहर मंदिर आहे. महंत ऋषी राज गिरी महाराज यांनी १९ नोव्हेंबरला सिव्हिल कोर्टात एक याचिका दाखल करून मशिदीचा सर्व्हे करण्याची मागणी केली होती. त्यावर न्यायालयाने सात दिवसांच्या आत सर्व्हे करण्याचा आदेश दिला होता. तसेच, सर्व्हे करणाऱ्या टीमला व्हिडिओ आणि फोटोग्राफीसह अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, रविवारी सर्व्हे करणारी टीम मशिदीत पोहोचली होती. त्यावेळी मशिदीच्या बाहेर जमलेल्या जमावाने अचानक पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे याठिकाणी तणाव निर्माण झाला.