आंतरराष्ट्रीय स्टार टेनिसपटू मारिया शारापोव्हाविरोधात गुरुग्राममध्ये एफआयआर दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2017 06:36 PM2017-11-03T18:36:41+5:302017-11-03T18:39:51+5:30
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय टेनिसपटू मारिया शारापोव्हाविरोधात गुरुग्राममध्ये फसवणूक केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आलं आहे.
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय टेनिसपटू मारिया शारापोव्हाविरोधात गुरुग्राममध्ये फसवणूक केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आलं आहे. घर खरेदीदाराच्या तक्रारीनंतर दिल्ली उच्च न्यायालयानं शारापोव्हाविरोधात तक्रार नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणेच बिल्डर कंपनी, अधिकारी यांच्याविरोधातही एफआयआर दाखल करण्यात आलं आहे.
नवी दिल्लीमधल्या गुरुग्राममधल्या बॅलेट बाय शारापोव्हा या प्रकल्पात एकानं घर खरेदी करण्यासाठी पैसे भरले होते. परंतु घर खरेदीच्या नावाखाली त्या व्यक्तीची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. शारापोव्हाविरोधात एफआयआर दाखल करणा-या 44 वर्षांच्या भावना अग्रवाल यांनी गुरुग्रामच्या सेक्टर 73 मध्ये होमस्टेड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रा. लि. अंतर्गत बनवण्यात येणा-या बिल्डिंगमध्ये फ्लॅट बूक केला होता. त्यासाठी त्यांनी 2013मध्ये 53 लाख रुपयेसुद्धा भरले होते. पहिला हप्ता दिल्यानंतर तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण केला जाईल, असा दावा इमारत बनवणा-या बिल्डर कंपनीने केला होता.
परंतु कंपनीचं ते आश्वासन हवेतच विरलं आहे. त्यामुळे फसवणूक झाल्याचं लक्षात येताच भावना अग्रवाल यांनी त्यांचे वकील पीयूष सिंग यांच्यामार्फत न्यायालयात दाद मागून घराचं आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डरविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली. कंपनीची जाहिरात आणि वेबसाइटवर मारिया शारापोव्हा स्वतः इथे टेनिस अकादमी चालवेल, असा दावा करण्यात येत होता. शारापोव्हा भारतात आल्यावर येथेच ट्रेनिंग अकादमी चालवेल, असंही जाहिरातींमधून सांगण्यात येत होते.