राम मंदिर उभारणीसाठी अवैध देणगी वसुली; राष्ट्रीय बजरंग दलाविरोधात FIR दाखल
By देवेश फडके | Published: January 17, 2021 11:36 AM2021-01-17T11:36:30+5:302021-01-17T11:38:16+5:30
राम मंदिर उभारणीसाठी कथित हिंदू संघटनांकडून फसवणूक केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुरादाबादमध्ये या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुरादाबाद : अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरातून देणगी गोळा करण्यास सुरुवात झाली आहे. यासंदर्भात देशभरात जागरूकता केली जात आहे. मात्र, राम मंदिर उभारणीसाठी कथित हिंदू संघटनांकडून फसवणूक केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुरादाबादमध्ये या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
राम मंदिर निधी समर्पण समितीचे मंत्री प्रभात गोयल यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, आमचे काही कार्यकर्ते मुरादाबादमधील कृष्णा नगर येथे असलेल्या काही भागांमध्ये राम मंदिर उभारणीसाठी देणग्या जमा करायला गेलो, तेव्हा दोन दिवसांपूर्वीच आम्ही देणग्या दिल्या आहेत, असे स्थानिकांकडून समजले. स्थानिकांनी पावत्याही दाखवल्या. यानंतर आमच्या कार्यकर्त्यांनी शोध घेतला. राष्ट्रीय बजरंग दल नामक संघटनेकडून देणग्या जमा केले जात आहेत, याची माहिती मिळाली. राम मंदिराच्या उभारणीसाठी देणग्या जमा करण्याचा अधिकार कोणत्याही अन्य व्यक्तीला नाही, असे गोयल यांनी सांगितले.
विश्व हिंदू परिषदेची युवा संघटना बजरंग दल आहे. राष्ट्रीय बजरंग दलाचा आणि विश्व हिंदू परिषदेचा काहीही संबंध नाही. त्यामुळे कथित राष्ट्रीय बजरंग दलाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषदेची युवा संघटना असलेल्या बजरंग दलाला बदनाम करण्याचा हा कट आहे. संबंधित संघटनेने आमच्या पावत्यांची नक्कल करून बनावट पावती पुस्तक छापले आहे. त्यामुळे या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती गोयल यांनी दिली.
विश्व हिंदू परिषदेकडून विविध भागांतून देणग्या गोळा करण्यासाठी विशेष पथक तयार केले जाते. पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते. यासाठी विशेष रचना आहे, असेही गोयल यांनी सांगितले.