ओडिशात मोठा रेल्वे अपघात टळला! एसी कोचमध्ये भीषण आग, डब्यात धुराचे लोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 13:00 IST2023-06-09T13:00:10+5:302023-06-09T13:00:30+5:30
नुआपाडा जिल्ह्यातील दुर्ग पुरी एक्स्प्रेसच्या डब्याला अचानक आग लागली.

ओडिशात मोठा रेल्वे अपघात टळला! एसी कोचमध्ये भीषण आग, डब्यात धुराचे लोट
नवी दिल्ली : ओडिशा रेल्वे दुर्घटनेला आठवडाही उलटलेला नाही. अशातच ओडिशातील नुआपाडा जिल्ह्यात मोठा रेल्वे अपघात टळला आहे. नुआपाडा जिल्ह्यातील दुर्ग पुरी एक्स्प्रेसच्या डब्याला अचानक आग लागली. या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या घटनेबद्दल माहिती देताना रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. तसेच सततच्या घर्षणामुळे ट्रेनच्या ब्रेक पॅडला आग लागली. आग ब्रेक पॅडपर्यंत मर्यादित होती. त्यामुळे या अपघातात कोणतीही हानी झाली नाही.
ब्रेक पॅडला आग - रेल्वे
रेल्वेने आपल्या निवेदनात म्हटले की, गुरुवारी संध्याकाळी ट्रेन खैरयार रोड स्थानकावर पोहोचली तेव्हा बी ३ कोचमध्ये धूर दिसून आला. तासाभरात ही आग विझवण्यात यश आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आणि रात्री ११ वाजता ट्रेन रवाना झाली.
खरं तर दुर्गपुरी एक्स्प्रेसच्या बी ३ कोचमध्ये धुराचे लोट पसरताच लोक ट्रेनमधून बाहेर पडले. त्यामुळे इतर प्रवाशांमध्येही खळबळ उडाली होती. ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील मोठ्या अपघातानंतर आठवडाभरात ही घटना घडली. ओडिशा रेल्वे अपघातात २८८ जणांचा मृत्यू झाला असून १२०० लोक जखमी झाले आहेत.