इंदौरमध्ये एका रुग्णालयाच्या कँटीनला आग, 100 रुग्णांना काढलं सुरक्षितरीत्या बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2017 12:59 PM2017-08-02T12:59:25+5:302017-08-02T13:00:26+5:30
एमवायएचच्या कँटीनमध्ये नाश्ता तयार करत असताना लागलेल्या आगीनंतर कर्मचा-यांनी तात्काळ तिथून सिलिंडर गॅस हटवले. त्याच वेळी रुग्णालयात ही माहिती समजल्यानंतर जवळपास 100 रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं.
मध्य प्रदेश, दि. 2 - इंदोरच्या महाराजा यशवंतराव या सरकारी रुग्णालया(एमवायएच)च्या कँटीनला आज सकाळी भीषण आग लागली. त्यानंतर तात्काळ बाह्य रुग्ण विभागा(ओपीडी)जवळील 100 रुग्णांना सुरक्षितरीत्या बाहेर काढलं आहे. रिपोर्टनुसार, आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशामक दलाच्या एका अधिका-यानं दिलेल्या माहितीनुसार, एमवायएचच्या कँटीनमध्ये नाश्ता तयार करत असताना लागलेल्या आगीनंतर कर्मचा-यांनी तात्काळ तिथून सिलिंडर गॅस हटवले. त्याच वेळी रुग्णालयात ही माहिती समजल्यानंतर जवळपास 100 रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. उपाहारगृहातील आग क्षणार्धात भडकली. मात्र त्या आगीवर अग्निशामक दलाच्या गाड्यांची वेळीच नियंत्रण मिळवल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे.
कँटीनमध्ये आग कोणत्या कारणास्तव लागली, याचा तपास केला जात आहे. आगीत कँटीनमधील सामानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. कँटीनमध्ये लागलेल्या या भीषण आगीमुळे महाराजा यशवंतराव या सरकारी रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग जवळपास 1 तास बंद ठेवण्यात आला होता. आगीवर पूर्णतः नियंत्रण मिळवल्यानंतर बाह्य रुग्ण विभाग पुन्हा सुरू करण्यात आलाय.
गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधल्या लखनऊमधील किंग जार्ज चिकित्सा विद्यापीठा(केजीएमयू)च्या ट्रॉमा सेंटरमध्येसुद्धा अशाच प्रकारची भीषण आग लागली होती. त्यावेळी ट्रॉमा सेंटरमध्ये 400हून अधिक रुग्ण उपचार घेत होते. एसीत शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती मिळाली होती. दुस-या मजल्यावर अॅडवान्स ट्रामा लाइफ सपोर्ट(एटीएलएस) वॉर्डमध्ये अचानक लागलेल्या आगीनं काही क्षणांत रौद्ररूप धारण केलं होतं. तिस-या मजल्यापर्यंत पसरल्यानंतर या आगीनं मेडिसिन स्टोरलाही विळख्यात घेतले होते. आगीच्या दुर्घटनेत हेमंत कुमार, वसीम आणि अरविंद कुमारसहीत 6 जणांचा मृत्यू झाला होता. चारही बाजूला पसरलेला धूर आणि भीषण आगीच्या भीतीपायी ऑपरेशन थिएटरमधून शस्त्रक्रियेदरम्यानच रुग्ण पळून गेले होते. त्यानंतर वॉर्डबॉयनं स्ट्रेचरच्या सहाय्यानं रुग्णांना खाली आणलं होतं. ट्रॉमा सेंटरच्या बाहेर रस्त्यावर स्टेचरवरील रुग्णांची रांगच रांग दिसत होती. त्यानंतर रुग्णांना लॉरी कार्डियोलॉजी, शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ट्रॉमा सेंटरमधील रुग्ण इतरत्र हलवल्यामुळे अनेक रुग्णालयांत बेड फूल झाले होते.