फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग, 6 जणांचा होरपळून मृत्यू तर अनेक गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 12:22 PM2021-10-27T12:22:27+5:302021-10-27T12:22:46+5:30
काही दिवसांपूर्वी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्ली, ओडिशा, राजस्थान आणि हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना फटाक्यांच्या विक्रीवरील बंदी उठवण्याची विनंती केली होती. त्यानंतर आता आज ही भीषण घटना घडली आहे.
कुल्लकुरीची:तामिळनाडूतील(Tamil Nadu) कल्लाकुरिची जिल्ह्यातील शंकरपुरम शहरात फटाक्यांच्या दुकानाला(Firecracker Shop) भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण घटनेत 6 जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. फटाक्यांच्या दुकानात आग लागली तेव्हा एवढा जोरदार स्फोट झाला, दूरपर्यंत हा आवाज ऐकू आला.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन(MK Stalin) यांनी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये आणि गंभीर जखमींना 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. अपघातात जखमी झालेल्यांना कल्लाकुरीची शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
#UPDATE | One more person killed in fire that broke out at a firecracker shop in Sankarapuram town of Kallakurichi district of Tamil Nadu last night, taking the death toll to 6; a total of 10 injuries reported.
— ANI (@ANI) October 27, 2021
फटाक्यावरील बंदी उठवण्याची विनंती केली होती
काही दिवसांपूर्वी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्ली, ओडिशा, राजस्थान आणि हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना फटाक्यांच्या विक्रीवरील बंदी उठवण्याबाबत पुनर्विचार करण्याची आणि हिरव्या फटाक्यांच्या विक्रीला परवानगी देण्याची विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांनी एका पत्राद्वारे राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं होतं की, फटाका उत्पादन उद्योगाशी निगडित सुमारे 8 लाख कामगारांची रोजीरोटी कठीण परिस्थितीत आहे. या आवाहनानंतर काही दिवसांनी तामिळनाडूच्या कल्लाकुरिची जिल्ह्यातील शंकरपुरम शहरात ज्या प्रकारे अपघात झाला. त्यानंतर खुद्द मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.