अग्निशमन यंत्र बनवणारा कारखाना जळून खाक, ८ जणांचा मृत्यू झाल्याची भीती; गुरुग्राम स्फोटांनी हादरले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 10:08 AM2024-06-22T10:08:40+5:302024-06-22T10:10:41+5:30
रात्रीपासून अग्निशमन दलाच्या १० हून अधिक गाड्या घटनास्थळी आहेत. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहेत.
गुरुग्राममधून एक मोठी बातमी समोर आली आहे. गुरुवारी रात्री उशिरा गुरुग्राममधील दौलताबाद औद्योगिक परिसरात अग्निशमन यंत्र बनवणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट झाल्यानंतर भीषण आग लागली. या अपघातात ८ कामगारांचा जळून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. रात्रीपासून अग्निशमन दलाच्या १० हून अधिक गाड्या घटनास्थळी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री २ वाजता कारखान्यात आग लागली. आग एवढी भीषण होती की, आगीच्या ज्वाळा तीन किलोमीटर दूरपर्यंत दिसत होत्या. ज्वाळा आणि स्फोट इतका तीव्र होता की घटनास्थळापासून १०० मीटरपेक्षा जास्त अंतरावर काही मृतदेह जवळच्या कारखान्यांमध्ये आढळून आले. पोलीस आणि अग्निशमन विभागाचे पथक अजूनही आतमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. या अपघातात आजूबाजूच्या १० हून अधिक कारखान्यांतील जड लोखंडी गेटर, अँगल आणि जड लोखंडी पत्रे पडले. यामध्येही मोठे नुकसान झाले आहे.
गुरुग्राम औद्योगिक परिसरासह शहरातील अनेक उद्योगांना फायर एनओसी नसल्याने उन्हाळ्यात आग लागण्याची भीती आहे. महापालिकेच्या दुटप्पीपणामुळे अनेक दिवसांपासून उद्योजकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर आगीच्या घटनांनंतर विमा कंपन्या महापालिकेच्या अग्निशमन विभागाने दिलेल्या अग्निशमन एनओसीचे कारण देत आगीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई उद्योगांना देत नाहीत.
गुरुग्राम शहर परिसरातील दौलताबाद, बसई, कादीपूर आणि बहरामपूर औद्योगिक क्षेत्र चार औद्योगिक क्षेत्रात एक हजार कारखाने. येथील नवीन औद्योगिक युनिट महापालिकेच्या फायर एनओसीचे निकष पाळत आहेत. यामध्ये औद्योगिक परिसरात अग्निशमन यंत्रे ठेवण्याबरोबरच फायर हायड्रंट किंवा पाण्याची टाकी व पंपाची व्यवस्था करावी लागते. औद्योगिक परिसरातही अग्निसुरक्षेशी संबंधित पाइपलाइन टाकाव्या लागतात. तसेच महापालिकेकडून बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेणे आवश्यक आहे. सुरुवातीला महापालिका एका वर्षासाठी उद्योगांना तात्पुरती फायर एनओसी देते. त्यानंतर त्यांना कायमस्वरूपी फायर एनओसी मिळते.