Agneepath: ‘अग्निपथ’वरून भडका! योजनेला विरोध; १३ राज्यांमध्ये पसरले लाेण, दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 07:18 AM2022-06-18T07:18:45+5:302022-06-18T07:18:53+5:30

Agneepath Scheme Protest: केंद्र सरकारच्या सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेला देशातील अनेक राज्यांतून तीव्र विरोध होत आहे. बिहारमध्ये संतप्त आंदोलकांनी तब्बल १२ रेल्वे जाळल्या आहेत. केंद्र सरकारच्या योजनेविरोधातील हे लोण आता १३ राज्यांत पसरले आहे.

Fire from 'Agneepath'! Opposition to the plan; Lane spread in 13 states, killing two | Agneepath: ‘अग्निपथ’वरून भडका! योजनेला विरोध; १३ राज्यांमध्ये पसरले लाेण, दोघांचा मृत्यू

Agneepath: ‘अग्निपथ’वरून भडका! योजनेला विरोध; १३ राज्यांमध्ये पसरले लाेण, दोघांचा मृत्यू

Next

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेला देशातील अनेक राज्यांतून तीव्र विरोध होत आहे. बिहारमध्ये संतप्त आंदोलकांनी तब्बल १२ रेल्वे जाळल्या आहेत. केंद्र सरकारच्या योजनेविरोधातील हे लोण आता १३ राज्यांत पसरले आहे. बिहारसह उत्तर प्रदेश, तेलंगणा, दिल्ली, राजस्थान, हरयाणा, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, मध्य प्रदेश, ओडिशा या राज्यात आंदोलकांनी उग्र निदर्शने केली. यात बिहार व तेलंगणध्ये प्रत्येकी एक मिळून दोघांचा मृत्यू झाला.

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये आंदोलकांनी अनेक रेल्वेंना आगीच्या हवाली केले. अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर आणि रस्त्यांवर उतरत निदर्शकांनी आपला संताप व्यक्त केला. तेलंगणाच्या सिकंदराबादमध्ये एका रेल्वे कोचला आग लावल्यानंतर कर्मचाऱ्यांनी धावपळ करत सर्व ४० प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. येथे हिंसक आंदोलनात एकाचा मृत्यू झाला. फिरोजाबादमध्ये आग्रा- लखनौ एक्स्प्रेस वेवर ४ बसमध्ये तोडफोड केली. हरयाणाच्या नारनौलमध्ये तरुणांनी रास्ता रोको केला. राजस्थानात भरतपूर रेल्वे स्टेशनवर आंदोलन करण्यात आले.

बिहारमधील सासाराम येथे रोष व्यक्त करण्यासाठी आंदोलकांनी टोल प्लाझाची तोडफोड केली. त्यानंतर तिथे असलेल्या सर्व वस्तूंची नासधूस करीत या ठिकाणी आंदोलकांनी आग लावली. रस्त्यावर उतरलेल्या तरुणांनी केलेल्या गोळीबारात एका पोलीस जवानाच्या पायाला गोळी लागली. त्यानंतर पोलिसांनी फायरिंग केली. 

२०० रेल्वे रद्द
आंदोलक रस्त्यावर उतरल्याने देशाच्या अनेक भागांत २०० रेल्वे रद्द केल्या. पूर्व मध्य रेल्वेच्या १६४, उत्तर पूर्व रेल्वेच्या ३४, उत्तर रेल्वेच्या १३ व पूर्वोत्तरच्या ३ रेल्वे रद्द केल्या आहेत. रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व मध्य रेल्वेने ६४ रेल्वेंना मध्येच थांबविले आहे. बिहारमध्ये १२ जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद केली आहे. सैन्य भरतीच्या नव्या प्रक्रियेविरुद्ध रोजगार संघर्ष संयुक्त मोर्चा आणि सैन्य भरती जवान मोर्चा यांनी १८ जून रोजी बिहार बंदची हाक दिली आहे.

बिहार : 12 रेल्वे जाळल्या
बिहारमध्ये अनेक ठिकाणी आंदोलकांनी १२ रेल्वे जाळल्या. लखीसरायमध्ये दोन रेल्वेंना आग लावण्यात आली. 
मुजफ्फरपूर- भागलपूर इंटरसिटीच्या एका प्रवाशाचा मृत्यू झाला. ज्या रेल्वेला आग लावली त्यात हा प्रवासी होता. 
आग लावण्यात आलेल्या रेल्वेमध्ये विक्रमशिला, लोहित, मुजफ्फरपूर, भागलपूर इंटरसिटी, बिहार संपर्क क्रांती, इस्लामपूर- हटिया एक्स्प्रेस, फरक्का एक्स्प्रेस, मालदा आदींचा समावेश आहे. 

तेलंगणात गोळीबारात एक ठार
तेलंगणात सिकंदराबाद स्टेशनवर आंदोलकांनी तोडफोड केल्यानंतर आणि रेल्वेला आग लावल्यानंतर पोलिसांनी गोळीबार केला. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. सिकंदराबादमध्ये ३०० ते ३५० लोकांच्या जमावाने एका रेल्वेच्या पार्सल कोचमध्ये आग लावली. या आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. 

तरुणांना फायदा हाेईल 
अग्निपथ योजनेत सहभागी होण्याची कमाल वयोमर्यादा वाढविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाने तरुणांना मोठा फायदा होणार आहे. कोरोना साथीच्या काळात गत दोन वर्षात सैन्यात भरती प्रक्रियेत अडथळे आले. नरेंद्र मोदी यांनी तरुणांची काळजी करत एक संवेदनशील निर्णय घेतला आहे.
    - अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री 

सरकारचे ‘डॅमेज कंट्रोल’, वयोमर्यादा वाढविली
लष्करात चार वर्षांसाठी भरती करावयाच्या अग्निपथ योजनेवरून देशातील युवकांचा विरोध वाढत असताना केंद्र सरकारने यावर ‘डॅमेज कंट्रोल’ करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 
अग्निवीरांच्या भरतीसाठी असलेली वयोमर्यादा २ वर्षांनी वाढविली आहे. यासंदर्भात दोन दिवसांत अधिसूचना जारी होईल, असे लष्कर प्रमुख मनोज पांडे यांनी म्हटले आहे.

Web Title: Fire from 'Agneepath'! Opposition to the plan; Lane spread in 13 states, killing two

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.