'द बर्निंग ट्रेन', धावत्या प्रवासी ट्रेनला लागली आग, प्रवाशांनी उड्या मारुन वाचवला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 05:37 PM2022-07-03T17:37:15+5:302022-07-03T17:38:13+5:30
आग लागल्याची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ ट्रेन थांबवली.
मोतिहारी: बिहारच्या मोतिहारीमध्ये रविवारी एका पॅसेंजर ट्रेनच्या इंजिनला आग लागल्याची घटना घडली आहे. इंजिनला आग लागली, तेव्हा ट्रेनमध्ये प्रवासी होते, पण सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. सकाळी 6.10 वाजता रक्सौलहून नरकटियागंजला जाणाऱ्या ट्रेनसोबत ही घटना घडली.
सुदैवाने सर्वजण सुखरुप
आग लागल्याची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ ट्रेन थांबवली. यादरम्यान प्रवाशांनीही रेल्वेतून उड्या मारून पळ काढण्यास सुरुवात केली. ट्रेनजवळ उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनीही बोगीत पोहोचून लोकांना खाली उतरवले. यानंतर इंजिनला जोडलेल्या बोगी वेगळ्या करण्यात आल्या. आता या बोगींना दुसरे इंजिन जोडून नरकटियागंजपर्यंत नेण्यात आले. प्रवासीही पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.
ट्रेन दररोज पहाटे 5:30 वाजता निघते
05541 पॅसेंजर ट्रेन रक्सौल जंक्शन येथून दररोज पहाटे 5.30 वाजता सुटते. दरम्यान, रविवारी ट्रेन रक्सौलमधील भेलाहीच्या पुल क्रमांक 39 जवळ आली असता इंजिनला अचानक आग लागली. यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी धूर पाहिल्यानंतर रेल्वेच्या इंजिनला आग लागल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ ट्रेन थांबवली, यावेळी जवानांच्या हुशारीमुळे मोठी दुर्घटना टळली. कर्मचाऱ्यांनी वेळीच रेल्वेचे इंजिन बोगीपासून वेगळे केले, त्यामुळे दुसऱ्या बोगीला आग लागली नाही.