ट्रेनला आग, खिडकीतून उडी मारून वाचवला जीव; 150 प्रवाशांसाठी यशपाल बनला 'देवदूत'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 10:26 AM2023-10-26T10:26:54+5:302023-10-26T10:38:48+5:30
रेल्वे प्रशासनाने घटनास्थळ गाठून स्थानिक लोकांच्या मदतीने रेल्वेच्या डब्यांना लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आलं.
पातालकोट एक्स्प्रेस ट्रेन पंजाबमधील फरीदकोटहून मध्य प्रदेशातील सियोनीकडे जात होती. याच दरम्यान अचानक दुपारी 3.37 वाजता आग्रापासून 10 किमी अंतरावर असलेल्या भांडई स्थानकाजवळ ट्रेनच्या दोन जनरल बोगींमध्ये आग लागली. आगीमुळे एकच गोंधळ उडाला. यानंतर काही प्रवाशांनी खिडकीतून उडी मारून आपला जीव वाचवला. अनेक जण आगीत होरपळले गेले, जखमींनी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रेल्वे प्रशासनाने घटनास्थळ गाठून स्थानिक लोकांच्या मदतीने रेल्वेच्या डब्यांना लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आलं. मात्र रेल्वेच्या गेटमनमुळे मोठा अनर्थ टळला आहे. न्यूजएजन्सीनुसार, गेट 487 वर तैनात गेटमन यशपाल सिंह यांना ट्रेनमधून धूर निघताना दिसला. त्यांनी तत्काळ स्टेशन मास्तरांना याची माहिती दिली. खबरदारी दाखवत स्टेशन मास्तरांनी ट्रेनच्या दोन्ही डब्यांचा वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर दोन्ही डबे ट्रेनपासून वेगळे करण्यात आले.
गेटमनने वेळीच धूर वाढत असल्याची माहिती दिली नसती तर मोठा अनर्थ घडला असता. त्यावेळी या दोन डब्यांमध्ये दीडशेहून अधिक प्रवासी होते, असे सांगण्यात येत आहे. सैन्यातून निवृत्त झालेले यशपाल सिंह हे भारतीय रेल्वेत गेटमन आहे. त्यांनी सांगितलं की, "पातालकोट ट्रेन 3.35 मिनिटांनी भांडई स्थानकावर पोहोचली. रेल्वेच्या चौथ्या डब्यातून धूर निघताना दिसला. ही सामान्य बोगी होती. मात्र तिथे काय चालले आहे याची ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या एकाही प्रवाशाला कल्पना नव्हती."
"धूर दिसताच मी स्टेशन मास्तर हरिदास यांना माहिती दिली. त्यानंतर हरिदास यांनी याबाबत नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर ट्रेन कंट्रोलरने ताबडतोब ओएचई प्रभारी यांना अप आणि डाऊन दिशेतील सर्व गाड्यांना वीजपुरवठा बंद करून तात्काळ ट्रेन थांबवण्याच्या सूचना दिल्या. दुपारी 3.37 वाजता गाडी थांबवण्यात आली. तोपर्यंत आग वेगाने पसरू लागली. जीव वाचवण्यासाठी प्रवासी ट्रेनमधून उतरू लागले. त्यातून बाहेर पडणेही कठीण झाले होते. पण जीवनाचा प्रश्न होता. त्यामुळे काहींनी खिडकीतून उड्याही मारल्या."
अग्निशमन दल, रुग्णवाहिका, आरपीएफ घटनास्थळी पोहोचले. प्रवासी बाहेर येताच ट्रेनला लागलेली आग विझवण्याचे काम सुरू करण्यात आले. तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, या अपघातात 11 जण आगीत होरपळले. राहुल कुमार (18), मोहित (25), शिवम (18) मनोज कुमार (34), हरदयाल (59), मणिराम (45), रामेश्वर (29), गौरव (22), सिद्धार्थ (18) हितेश (17) आणि या अपघातात विकास (17) हे जखमी झाले आहेत.