तेलंगण मुख्यमंत्र्यांच्या यज्ञात राष्ट्रपती येण्यापूर्वी आग
By admin | Published: December 28, 2015 04:22 AM2015-12-28T04:22:07+5:302015-12-28T04:22:07+5:30
तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आयोजित केलेल्या ‘यज्ञ’स्थळी रविवारी दुपारी भीषण आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही प्राणहानी झाली नाही आणि आगीवर लगेच नियंत्रण मिळविण्यात आले.
सात कोटींचा खर्च; मुखर्जींचा दौरा रद्द
हैदराबाद : तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आयोजित केलेल्या ‘यज्ञ’स्थळी रविवारी दुपारी भीषण आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही प्राणहानी झाली नाही आणि आगीवर लगेच नियंत्रण मिळविण्यात आले. दरम्यान आगीच्या घटनेनंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेटही रद्द करण्यात आली. ते रविवारी शेवटच्या दिवशी पूर्णाहुतीच्या वेळी यज्ञस्थळाला भेट देणार होते. राव यांनी मेडक जिल्ह्याच्या एर्रावेल्ली गावातील आपल्या फार्महाउसवर हा पाच दिवसांचा ‘आयुथा चंडी महायज्ञ’ आयोजित केलेला होता. रविवारी दुपारी १.३० वाजता यज्ञ सुरू असताना ‘होमकुडा’पासून आग भडकली आणि लगेच ‘यज्ञशाला मंडपा’पर्यंत पोहोचली. ही आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाचे तीन बंब कामी आले. या आगीत यज्ञशाला मंडप जळाले. संपूर्ण यज्ञमंडप बांबू आणि गवताने बांधलेला होता, त्यामुळे आग झटकन पसरली. सुमारे पाऊण तासाने आग विझविण्यात आली. हजारो भविकांची गर्दी होती. पण आग लागताच पोलिसांनी बॅरिकेड तोडून वाट मोकळी केली. परिणामी भीतीमुळे होणाऱ्या संभाव्य चेंगराचेंगरीचा धोकाही टळला.
राष्ट्रपती मुखर्जी हे यज्ञाच्या शेवटच्या दिवशी येथे भेट देणार होते. पण आता त्यांची ही भेट रद्द करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. लोककल्याण आणि विश्व शांतीसाठी या यज्ञाचे आयोजन केले आहे. २३ डिसेंबरपासून प्रारंभ झालेल्या या यज्ञासाठी राव यांनी किमान सात कोटी रुपये खर्च केले आहेत. या यज्ञात तेलंगण, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूतील २००० पुजारी भाग घेत आहेत. दरम्यान, दुष्काळग्रस्त तेलंगणमध्ये यज्ञावर सात कोटी रुपये खर्च केल्याबद्दल टीका करण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)
——————————
राष्ट्रपती येऊन परतले?
दु. १.३० ते २.३० या वेळात महायज्ञाची पूर्णाहुती होणार होती. त्यासाठी राष्ट्रपती येण्याच्या काही मिनिटे आधीच यज्ञशळेत आग लागली. आगीचे लोळ उठत असताना तीन हेलिकॉप्टर त्या परिसरावर घिरटया घालताना दिसल्याचे स्थानिक लोकांनी सांगितले. राष्ट्रपतींना घेऊन आलेल्या हेलिकॉप्टरचा तो ताफा होता का? आणि राष्ट्रपती यज्ञस्थळापर्यंत येऊन आगीमुळे परत गेले का? या प्रश्नांची नक्की उत्तरे मिळाली नाहीत.