दिवाळीत 'या' राज्यांमध्ये फटाक्यांवर बंदी, जाणून घ्या कोणत्या राज्यात काय आहेत नियम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 03:28 PM2021-10-28T15:28:14+5:302021-10-28T15:31:58+5:30
Firecrackers banned on Diwali: वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर काही राज्यांनी दिवाळीत फटाक्यांवर पूर्ण बंदी घातली आहे, तर काही राज्य सरकारांनी फक्त ग्रीन फटाक्यांना परवानगी दिली आहे आणि त्यासाठी कालमर्यादा निश्चित केली आहे.
नवी दिल्ली: दिवाळीत फटाक्यांमुळे(Firecrackers) होणाऱ्या प्रदुषणावर आळा घालण्यासाठी राज्य सरकारांनी कंबर कसली असून आहे. या पार्श्वभूमीवर काही राज्यांनी फटाक्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे, तर काही राज्य सरकारांनी हिरवे फटाके फोडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, त्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. फटाक्याच्या धुरामुळे आणि आवाजामुळे वायू आणि ध्वनी प्रूषण वाढतं. या फटाक्यामुळे हवेती गुणवत्ताही कमी होते. कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात फटाके जाळणे अधिक धोकादायक आहे, कारण प्रदूषणामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते आणि लोकांना श्वास घेण्यास त्रास होतो.
अनेक राज्यांनी फटाक्यांवर बंदी घातली
ही सर्व कारणे लक्षात घेऊन अनेक राज्य सरकारांनी फटाक्यांच्या वापरावर पूर्ण बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच खरेदी-विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे. तसेच, काही राज्यांमध्ये फक्त ग्रीन फटाकेच जाळण्याची परवानगी देण्यात आली आहे, परंतु त्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशसारख्या इतर अनेक राज्यांनी सणासुदीच्या काळात प्रदूषणाची पातळी लक्षात घेऊन काही जिल्ह्यांमध्ये फटाके विक्री आणि वापरावर बंदी घातली आहे. छत्तीसगड सरकारने फटाके फोडण्याची ठराविक वेळ ठरवून दिली आहे. महाराष्ट्र सरकारने फटाक्यांच्या वापरावर बंदी घातली नसून, लोकांना यावर्षी फटाके फोडण्यापासून परावृत्त करण्याची विनंती केली आहे.
या राज्यांमध्ये फटाक्यांवर बंदी
दिल्ली
दरवर्षी दिल्लीत, हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) हिवाळ्याच्या प्रारंभासह खराब पातळीवर पोहोचतो आणि हे लक्षात घेऊन दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने राष्ट्रीय राजधानीत 1 जानेवारी 2022 पर्यंत फटाके फोडण्यास बंदी घातली आहे. प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी दिल्ली सरकारनेही फटाक्यांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आहे.
ओडिशा
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ओडिशा सरकारने फटाके विक्री आणि वापरावरही पूर्ण बंदी घातली आहे. सरकारच्या अधिकृत आदेशात म्हटले आहे की, सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी या उत्सवाच्या महिन्यात फटाक्यांची विक्री आणि वापर प्रतिबंधित राहील.
राज्य सरकारने पंजाबमध्ये फटाक्यांची साठवणूक, वितरण, विक्री, वापर आणि उत्पादनावर बंदी घातली आहे. मात्र, सरकारने सणांच्या दिवशी हिरव्या फटाक्यांच्या वापर आणि विक्रीला परवानगी दिली आहे. राज्यात दिवाळीला रात्री 8 ते 10 या वेळेतच लोकांना फटाके फोडण्याची परवानगी असेल.
पश्चिम बंगाल
पश्चिम बंगालमध्ये वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांच्या विक्रीवर आणि वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, दिवाळी आणि छठपूजेला ग्रीन फटाके फोडण्यास परवानगी असेल. यासाठी दोन तासांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. दिवाळीला रात्री 8 ते 10 आणि छठपूजेला 6 ते 8 या वेळेत लोक हिरवे फटाके लावू शकतात.