पाक सैन्याचा सीमेवर गोळीबार
By admin | Published: July 1, 2017 01:04 AM2017-07-01T01:04:50+5:302017-07-01T01:04:50+5:30
पाकिस्तानी लष्कराने शस्त्रबंदी झुगारत राजौरीतील नियंत्रणरेषेवरील भारतीय चौक्यांवर तसेच नागरी वस्त्यांवर उखळी तोफांतून बॉम्बगोळे डागत गोळीबारही केला.
जम्मू/श्रीनगर : पाकिस्तानी लष्कराने शस्त्रबंदी झुगारत राजौरीतील नियंत्रणरेषेवरील भारतीय चौक्यांवर तसेच नागरी वस्त्यांवर उखळी तोफांतून बॉम्बगोळे डागत गोळीबारही केला. उरी क्षेत्रातील ग्वालटा भागात पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एक महिला जखमी झाली. भारतीय जवानांनीही तत्काळ पलटवार करीत चोख उत्तर दिले. जून महिन्यात पाकिस्तानने नियंत्रणरेषेवर गोळीबार करीत २३ वेळा शस्त्रबंदीचे उल्लंघन केले आहे.
शुक्रवारी पहाटे ४.१५ वाजता पाकिस्तानी सैनिकांनी राजौरीतील भीमभेर गली भागात बेछूट तोफमाऱ्यासह गोळीबार केला, असे संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले. पाकिस्तानने डागलेल्या तोफगोळ्याचा घराजवळच स्फोट झाल्याने यात ३५ वर्षांची महिला नसीम अख्तर या जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या भागातील पाण्याच्या टाकीचेही या हल्ल्यात नुकसान झाले. पाकिस्तानी लष्कराने केलेल्या हल्ल्यामुळे स्थानिकांना भीतीने ग्रासले आहे. (वृत्तसंस्था)
मिरवाइज फारूख नजरकैदेत-
फुटीरवादी हुरियत कॉन्फरन्सचे नेते मिरवाइज उमर फारूख यांना नजरकैद करण्यात आले आहे. ते नौहत्ता भागातील प्रार्थनास्थळाकडे जाण्यासाठी घराबाहेर पडताच पोलिसांनी त्यांना रोखले.
तसेच नजरकैद करण्यात आल्याचे त्यांना सांगितले. हुरियतच्या निषेध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता ध्यानात घेऊन त्यांना नजरकैद करण्यात आले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
अमेरिकेने हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या सयद सलाहुद्दिन याला जागतिक दहशतवादी घोषित केल्याच्या निषेधार्थ फुटीरवादी संघटना निषेध नोंदवीत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून श्रीनगर शहरातील विविध भागांत निर्बंध जारी करण्यात आले आहेत.
शरीफ यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक-
शस्त्रबंदी मोडून काश्मीरमध्ये होत असलेल्या हल्ल्यामुळे भारतासोबतचे संबंध अधिक तणावपूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी विदेशी धोरणाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी उच्चस्तरीय बैठकीत चर्चा केली.
रेडिओ पाकिस्तानच्या वृत्तानुसार, भारत आणि अफगाणिस्तानशी संबंधित मुद्द्यांवर शरीफ यांना माहिती देण्यात आली. वित्तमंत्री इसहाक दार आणि विदेश मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.