जम्मूमध्ये पाकिस्तानी रेंजर्सकडून गोळीबार, बीएसएफच्या एका जवानाला वीरमरण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 11:38 AM2023-11-09T11:38:07+5:302023-11-09T11:38:43+5:30
Jammu Kashmir: जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील रामगड सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर आज सकाळी पाकिस्तानी रेंजर्सनी तुफान गोळीबार केला. या गोळीबारामध्ये बीएसएफच्या एका जवानाला हौतात्म्य प्राप्त झालं आहे.
जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील रामगड सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर आज सकाळी पाकिस्तानी रेंजर्सनी तुफान गोळीबार केला. या गोळीबारामध्ये बीएसएफच्या एका जवानाला हौतात्म्य प्राप्त झालं आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय सीमारेषेवरील चौक्यांना लक्ष्य करून पाकिस्तानी रेंजर्सनी हा गोळीबार केला. गेल्या २४ दिवसांत पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्याची ही तिसरी वेळ आहे.
अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानी रेंजर्सच्या गोळीबारामध्ये बीएसएफचा एक जवान जखमी झाला होता. त्याला उपचारांसाठी स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्याला जम्मू येथील जीएमसी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, बीएसएफकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार रात्री पाकिस्तानी रेंजर्सनी रामगड परिसरात विनाकारण गोळीबार केला. बीएसएफकडूनही त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
जेरडा येथील ग्रामस्थ मोहन सिंह भट्टी यांनी सांगितले की, काल रात्री १२.३० च्या सुमारास गोळीबार सुरू झाला. त्यानंतर गोळीबाराचे प्रमाण वाढत गेले. आंतरराष्ट्रीय सीमेवरून गोळीबार आणि तोफांचा मारा होत असल्याने भीतीचे वातावरण आहे. दरम्यान पाकिस्तानी रेंजर्सनी २८ ऑक्टोबर रोजीसुद्धा सुमारे ७ तास गोळीबार केला होता. त्यामुळे बीएसएफचे दोन जवान आणि एक महिला जखमी झाली होती.