भाजपा आमदारावर गोळीबार, पत्नीसोबत नाईट वॉक करत असताना झाडल्या गोळ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 16:37 IST2025-01-02T16:35:57+5:302025-01-02T16:37:43+5:30
Firing on BJP MLA: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे भाजपा आमदार सौरभ सिंह सोनू यांच्यावर गोळीबार झाला आहे. आमदार सौरभ सिंह सोनू हे पत्नीसोबत नाईट वॉक करत असताना हा गोळीबार झाला.

भाजपा आमदारावर गोळीबार, पत्नीसोबत नाईट वॉक करत असताना झाडल्या गोळ्या
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे भाजपाआमदार सौरभ सिंह सोनू यांच्यावर गोळीबार झाला आहे. आमदार सौरभ सिंह सोनू हे पत्नीसोबत नाईट वॉक करत असताना त्यांनी घराजवळ दोन दुचाकीस्वार तरुणांना पाहिले. हे दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते. आमदार महोदयांनी त्यांना हटकले असता त्यांनी शिविगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच आमदारांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं असता हवेत गोळीबार करून फरार झाले. या प्रकरणी सौरभ सिंह सोनू यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. तसेच पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
हे संपूर्ण प्रकरण लखीमपूर खीरी येथील सदर कोतवाली ठाणे क्षेत्रामधील आहे. येथे बुधवारी रात्री झालेल्या गोळीबारामुळे खळबळ उडाली आहे. कस्ता येथील भाजपा आमदार सौरभ सिंह सोनू यांची दोन तरुणांसोबत बाचाबाची झाली. त्यानंतर या तरुणांनी हवेत गोळीबार केला. सुदैवाने कुणालाही गोळी लागली नाही. ही घटना घडली तेव्हा आमदार सौरभ सिंह सोनू यांचे सुरक्षा रक्षक त्यांच्यासोबत नव्हते.
आमदार सौरभ सिंह यांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, रोज रात्रीचं भोजन झाल्यानंतर मी घराबाहेर फिरतो. काल रात्रीसुद्धा फिरत होतो. त्यावेळी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास मला घरापासून ५०-१०० मीटर अंतरावर दुचाकी घेऊन असलेले दोन तरुण दिसले. तसेच ते अर्वाच्च भाषेत बोलत होते. जेव्हा मी त्यांना हटकले तेव्हा ते माझ्याशी वाद घालू लागले. तसेच त्यांनी हवेत गोळीबार केला. जर त्यांनी थेट गोळीबार केला असता तर काही अघटित घडण्याची शक्यता होती.
सिंह पुढे म्हणाले की, रात्री फिरणं माझ्या नियमित जीवनशैलीचा भाग आहे. या युवकांना याची आधीपासून माहिती असण्याची शक्यता आहे. सुदैवाने कुणालाही गोळी लागली नाही, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली असून, त्यांनी पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.