पाकिस्तानकडून राजौरी, सांभा जिल्ह्यात गोळीबार, तोफमारा
By admin | Published: June 12, 2017 12:01 AM2017-06-12T00:01:54+5:302017-06-12T00:01:54+5:30
पाकिस्तानी लष्कराने राजौरी आणि सांभा जिल्ह्यात रविवारी आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवरील ठिकाणांवर गोळीबार आणि तोफांच्या केलेल्या माऱ्याला भारतीय सैन्याने चोख प्रतिउत्तर दिले.
जम्मू : पाकिस्तानी लष्कराने राजौरी आणि सांभा जिल्ह्यात रविवारी आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवरील ठिकाणांवर गोळीबार आणि तोफांच्या केलेल्या माऱ्याला भारतीय सैन्याने चोख प्रतिउत्तर दिले.
पाकिस्तानच्या लष्कराने राजौरी जिल्ह्यात नौशेरा क्षेत्रात नियंत्रण रेषेवर १२.४० वाजता छोट्या शस्त्रांतून बेछूट गोळीबार केला, जड स्वयंचलित तोफांचा मारा केला, असे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले.
सांभा जिल्ह्यातील रामगढ सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी रेंजर्सनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत सीमा सुरक्षा दलांवर गोळीबार केला, असे बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. बीएसएफनेही त्याचा चोख प्रतिकार केला.
घुसखोरीविरोधातील कारवाईत लष्कराने शुक्रवारी पाच अतिरेक्यांना ठार मारले. उरी क्षेत्रात नियंत्रण रेषेवर ही कारवाई झाली. हे अतिरेकी ‘फियादीन’ तुकडीतील होते व त्यांचा आत्मघाती हल्ल्यांचा प्रयत्न होता. झडतीमध्ये मोठ्या प्रमाणावर दारुगोळा व शस्त्रे जप्त करण्यात आली.
जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचे अध्यक्ष यासिन मलिक मोहम्मद यासिन मलिक यांना रविवारी दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात स्थानबद्ध करण्यात आले. शांततेचा भंग होईल या भीतीतून त्यांना स्थानबद्ध करण्यात आले.