हल्लीच्या काळातील पहिलीच कारवाई; भाजपने आमदार बसनगौडा पाटलांची केली हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 19:43 IST2025-03-26T19:42:11+5:302025-03-26T19:43:20+5:30
Basangowda Patil Yatnal News: भाजपाचे कर्नाटकमधील आमदार बसनगौडा पाटील यतनाळ यांची पक्षाने सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. सोन्याची तस्करी करणारी रान्या राव हिच्यावर पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

हल्लीच्या काळातील पहिलीच कारवाई; भाजपने आमदार बसनगौडा पाटलांची केली हकालपट्टी
देशभरात एवढे वाचाळवीर राजकारणी झाले आहेत की रोज उठून वाट्टेल ते बरळले जात आहे. महिलांविरोधात, एखाद्या थोर पुरुषाविरोधात, धर्मांविरोधात हे वाचळवीर राजकारणी बोलत असतात. त्यांना त्यांचे त्यांचे पक्ष पाठीशी घालत असतात. काँग्रेस, सपाच नाही तर भाजपातही अशा वाचाळवीरांची मोठी संख्या आहे. परंतू, यांच्यावर कारवाई काही केल्या होत नाही. परंतू, भाजपाने हल्लीच्या काळातील पहिलीच कारवाई केली आहे.
भाजपाचे कर्नाटकमधील आमदार बसनगौडा पाटील यतनाळ यांची पक्षाने सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. सोन्याची तस्करी करणारी रान्या राव हिच्यावर पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
पक्ष शिस्त मोडल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यतनाळ यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली होती. त्यावर त्यांचे उत्तर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यतनाळ हे विजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. बसनगौडा पाटील हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) पार्श्वभूमी असलेले नेते आहेत. पक्षाच्या कारवाईवर बसनगौडा पाटील यत्नाळ यांची प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. परंतू याच पाटलांनी डिसेंबर २०२३ मध्ये भाजपला धमकी दिली होती. मला पक्षातून काढून टाकले तर मी कोरोनामधील घोटाळे उघड करेन, असे त्यांनी म्हटले होते.
बसनगौडा पाटील अभिनेत्री राववर वक्तव्य करताना तिने सोने तिच्या गुप्तांगात लपवले होते, असे म्हटले होते. यासाठी त्यांनी अश्लिल शब्द वापरला होता. आता भाजपाने कारवाई केली आहे. तुम्ही तुमचे वर्तन सुधारण्याचे आश्वासन दिले होते पण ते झाले नाही. तुम्ही वारंवार पक्ष शिस्तीचे उल्लंघन केले आहे, म्हणून तुम्हाला पुढील सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकण्यात येत आहे, असे भाजपाने कळविले आहे.