पहिलाच विमान प्रवास...आणि खुद्द राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींची भेट

By admin | Published: June 23, 2017 12:28 AM2017-06-23T00:28:42+5:302017-06-23T00:28:42+5:30

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील वेगवेगळ्या शाळेतील ३५ विद्यार्थ्यांसाठी २१ जूनची दुपार अविस्मरणीय ठरली. ते प्रथमच विमानाने प्रवास करून दिल्लीत पोहोचले होते

First air travel ... and a visit of President, Vice-President himself | पहिलाच विमान प्रवास...आणि खुद्द राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींची भेट

पहिलाच विमान प्रवास...आणि खुद्द राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींची भेट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील वेगवेगळ्या शाळेतील ३५ विद्यार्थ्यांसाठी २१ जूनची दुपार अविस्मरणीय ठरली. ते प्रथमच विमानाने प्रवास करून दिल्लीत पोहोचले होते आणि त्यांच्या समोर होते दस्तुरखुद्द राष्ट्रपती प्रणव मुखर्जी. ‘राष्ट्रपती भवन’मध्ये मुखर्जी यांना भेटल्यानंतर या विद्यार्थ्यांनी संवाद साधला उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्याशी. नामवंतांसाठी स्वप्नवत असते अशी ही संधी या ३५ विद्यार्थ्यांना मिळाली ती ‘लोकमत संस्कारांचे मोती’ या उपक्रमामुळे. ‘लोकमत संस्कारांचे मोती’ या उपक्रमाचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी या दोघांनी मनापासून कौतुक केले.
‘लोकमत संस्कारांचे मोती २०१६’ स्पर्धेत महाराष्ट्रभरातील शाळांमधून हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एक याप्रमाणे ३५ विजेत्या विद्यार्थ्यांनी बुधवारी २१ जून रोजी नागपूर-दिल्ली-नागपूर व मुंबई-दिल्ली-मुंबई असा विमान प्रवास केला. विद्यार्थ्यांनी बुधवारी दुपारी दीड वाजता राष्ट्रपती मुखर्जी यांची भेट घेतली. राष्ट्रपतींनी या सर्व मुलांचे अभिनंदन केले व दै. ‘लोकमत’च्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. मुखर्जी यांची भेट व दिमाखदार ‘राष्ट्रपती भवन’ पाहून हे विद्यार्थी हरखून गेले होते. त्यानंतर उपराष्ट्रपती अन्सारी यांचीही भेट घेतली. या वेळी उपराष्ट्रपतींनी ‘आमचे मित्र विजयबाबू दर्डा येणार होते, ते का आले नाहीत?’ असा प्रश्न विद्यार्थ्यांना विचारला. त्यानंतर त्यांनी सर्व मुलांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून दिली. उपराष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना भविष्यात करिअरचा कोणता मार्ग निवडणार? इंजिनीअर, डॉक्टर, पायलट, समाजसेवक यापैकी तुम्हाला काय व्हायला आवडेल असे विचारले. त्याचबरोबर तुम्हाला सैन्यात जायला आवडेल का? असे त्यांनी विचारले असता आम्हाला सैन्यात भरती व्हायला आवडेल, असे उत्तर बहुतांश विद्यार्थ्यांनी दिले. हे उत्तर ऐकून उपराष्ट्रपतींनी त्यांचे अभिनंदन केले. तुमच्यापैकी किती जणांचा हा पहिलाच विमान प्रवास होता असा प्रश्न अन्सारी यांनी विचारल्यावर सर्व ३५ मुलांनी हात वर केले. त्याचबरोबर पहिल्याच विमान प्रवासाचे मुलांनी उत्स्फूर्तपणे अनुभव कथन केले. अन्सारी यांनी या वेळी महाराष्ट्रातील शिक्षण पद्धतीचेही कौतुक केले.
उपराष्ट्रपतींनी ‘संस्कारांचे मोती’ या उपक्रमाबद्दल माहिती विचारली. तेव्हा ‘लोकमत’चे उपाध्यक्ष वसंत आवारे यांनी या उपक्रमाची संकल्पना विशद केली. ती ऐकून अन्सारी यांनी ‘लोकमत’ व विजय दर्डा यांचे अभिनंदन केले. उपराष्ट्रपतींनी प्रत्येक विद्यार्थ्याला टी-शर्ट, पेन, टोपी या भेटवस्तू दिल्या. ‘लोकमत’च्या वतीने विद्यार्थ्यांसाठी नाश्ता, जेवण तसेच दिल्ली सैरसाठी व्होल्वो बसची व्यवस्था करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी रेल्वे म्युझियम, गांधी स्मृती भवन, इंदिरा गांधी स्मृती भवन, इंडिया गेट आदी ठिकाणांना भेट दिली.
मुंबई आणि नागपूर विमानतळावर विद्यार्थी परतल्यानंतर अनेक पालक विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आले होते. सर्व पालकांनी ‘लोकमत’च्या या उपक्रमाचे कौतुक करून ‘लोकमत’चे आभार मानले.

Web Title: First air travel ... and a visit of President, Vice-President himself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.