मराठी उद्योजकांच्या संघटनेचा पहिला वर्धापन दिन ‘लॉर्डस्’वर
By admin | Published: May 7, 2017 01:09 AM2017-05-07T01:09:57+5:302017-05-07T01:09:57+5:30
ब्रिटनमधील धडाडीच्या महाराष्ट्रीयन व्यावसायिक आणि उद्योजकांनी स्थापन केलेल्या OMPEG चा (महाराष्ट्रीयन व्यावसायिक व उद्योजकांची संघटना) पहिला
केदार लेले/ आॅनलाइन लोकमत
लंडन : ब्रिटनमधील धडाडीच्या महाराष्ट्रीयन व्यावसायिक आणि उद्योजकांनी स्थापन केलेल्या OMPEG चा (महाराष्ट्रीयन व्यावसायिक व उद्योजकांची संघटना) पहिला वर्धापन दिन प्रतिष्ठित लॉर्डस् मैदानावर नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या संघटनेची गेल्या वर्षी लंडनमध्ये स्थापन करण्यात आली होती.
वर्धापन दिन सोहळ्याला उद्योजक उदय ढोलकिया, मिलिंद कांगले, जसबीर सिंग परमार आणि बनेश प्रभू आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना मौलिक मार्गदर्शन केले. या सोहळ्यासाठी ब्रिटनच्या विविध भागांतून अनेक महाराष्ट्रीयन व्यावसायिक आणि उद्योजक आले होते.
वारसा हक्कपत्र, अर्थ आणि वित्त व्यवस्थापन, कर योजना यावरील चर्चासत्रात तज्ज्ञ विनिता देशपांडे, रंजिता दळवी, शिवानी प्रभुणे आणि अक्षय शहा यांनी आपले विचार मांडले, तसेच सल्ले दिले. राजन शेगुंशी, राजेंद्र देवकर आणि मयुरा चांदेकर यांच्या सुरेल गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
उपस्थितांनी लॉर्डस् क्रिकेट ग्राऊंडच्या इव्हेन्ट मॅनेजमेंट टीमने आयोजित केलेल्या सुग्रास जेवणाचा आस्वाद घेतला! संघटनेने स्थानिक पातळीवरील उद्योजकांना मंच उपलब्ध करून देण्यासाठी लंडनमध्ये प्रदर्शन मेळावा आयोजित करण्यासह अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.
आॅनर्स पुरस्कार
राजीव बेनोडेकर, राजन शेगुंशी, मानसी बर्वे, प्रणव देव, अभय जोशी, राहुल घोलप, मनोज वसईकर आणि मनोज कारखानीस यांना त्यांच्या योगदानाबद्दल डटढएॠ आॅनर्स पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.
भावी उद्दिष्टे
संस्थापकांनी OMPEG ला २०२० पर्यंत २० नवीन उपक्रम किंवा प्रकल्प सुरू करण्याचे लक्ष्य दिले आहे. पहिल्याच वर्षी त्यापैकी तीन-चार उपक्रम हाती घेऊन, त्या दिशेने पावलेसुद्धा उचलण्यात आली आहेत.
माजी क्रिकेटपटू व आर्थिक सल्लागार मधू गुप्ते मेरिलबोन क्रिकेट क्लबचे सदस्य असल्यामुळे पहिला वर्धापन दिन आणि चर्चासत्रासाठी लॉर्डस्चे प्रतिष्ठित स्थळ निश्चित करण्यात त्यांची मोलाची मदत झाली. संस्थेचे संस्थापक सभासद - अनिरुद्ध कापरेकर, सुशील रापतवार, जय तहसीलदार, अथर्व टिल्लू, रवींद्र गाडगीळ,अमरीश जोईजोडे आणि दिलीप आमडेकर यांनी संयुक्तरीत्या सूत्रसंचालन करण्यासह कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला. डॉ. विजेंद्र इंगळे, मानसी बर्वे यांनी सोहळ्याचे चित्रीकरण आणि प्रक्षेपण केले.