महिला लढाऊ वैमानिकांची पहिली तुकडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2016 04:56 AM2016-06-19T04:56:01+5:302016-06-19T04:56:01+5:30

भारतीय हवाई दलात शनिवारी इतिहास घडला. अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंह या तिघींना भारताच्या पहिल्या लढाऊ वैमानिक म्हणून नियुक्ती (कमिशन) मिळाली.

The first batch of women's combat pilots | महिला लढाऊ वैमानिकांची पहिली तुकडी

महिला लढाऊ वैमानिकांची पहिली तुकडी

googlenewsNext

हैदराबाद : भारतीय हवाई दलात शनिवारी इतिहास घडला. अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंह या तिघींना भारताच्या पहिल्या लढाऊ वैमानिक म्हणून नियुक्ती (कमिशन) मिळाली. महिला कोणत्याही क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करू शकतात, हे या तिघींनी दाखवून दिले असून, त्यांच्यामुळे भारतीय हवाई दलाला महिला लढाऊ वैमानिकांची पहिली तुकडी मिळाली आहे.
डुंडीगल येथील हवाई दल अकादमीच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित असलेले संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी महिलांना प्रथमच लढाऊ वैमानिकाची भूमिका देण्यात येत असून, हा दिवस सोनेरी अक्षरात लिहिण्याचा आहे, असे उद्गार काढले.
सशस्त्र दलांत लैंगिक समानतेच्या प्रयत्नांना चालना देत, असलेले पर्रिकर म्हणाले की, ‘येणाऱ्या काही वर्षांत सुरक्षा दलांत संपूर्ण लैंगिक समानता प्रस्थापित केली जाईल. काही क्षेत्रांत आम्हाला तांत्रिक व प्रशासकीय अडचणींना सामोरे जावे लागू शकते. मात्र, आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.’
लढाऊ वैमानिक म्हणून नियुक्ती मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना या तिघी म्हणाल्या की, ‘त्या स्वत:ला भाग्यशाली समजतात आणि आपली जबाबदारी पार पाडण्यास उत्सुक आहेत. या तिघींनी भारतीय हवाई दलाच्या विविध शाखांतील फ्लाइट कॅडेटस्चे नियुक्तीपूर्व प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे.’
त्यांना कर्नाटकातील बीदर येथे जावे लागेल. तेथे त्या हॉक आधुनिक जेट प्रशिक्षण विमानांवर तिसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण घेतील. त्यानंतर, त्यांना सुपरसॉनिक लढाऊ विमाने चालविण्याची संधी मिळेल. लढाऊ वैमानिक बनण्यासाठी आयएएफमध्ये सामान्य वैमानिक पदासाठी निवड झालेल्या सहा जणींत चुरस होती. निवड चाचणीनंतर तीन प्रशिक्षणार्थी महिलांना या खडतर प्रशिक्षणासाठी निवडण्यात आले. (वृत्तसंस्था)

भारतीय हवाई दलात
1991
मध्ये महिलांना वैमानिक म्हणून स्थान देण्यात आले होते. मात्र त्यांच्या सेवा केवळ हेलीकॉप्टर्स व परिवहन विमान या पुरत्याच मर्यादित होत्या.

निवड झाल्यानंतर लगेचच आम्हाला ही मोठी संधी मिळाली आहे. एक चांगली लढाऊ वैमानिक बनून मी माझ्या देशाला व आई-वडिलांना अभिमान वाटेल असे काम करेन, असे भावना कांत हिने म्हटले.

पर्रिकर यांनी सलामी स्वीकारली आणि राष्ट्रपतींकडून १३० फ्लाइट कॅडेटस्ना कमिशन दिले. यात २२ महिलांचा समावेश असून, त्यांना फ्लाइंग आॅफिसर्स म्हणून कमिशन देण्यात आले.

Web Title: The first batch of women's combat pilots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.