महिला लढाऊ वैमानिकांची पहिली तुकडी १८ जूनला हवाई दलात
By Admin | Published: March 9, 2016 05:07 AM2016-03-09T05:07:38+5:302016-03-09T05:07:38+5:30
तीन सैनिकांचा समावेश असलेली महिला लढाऊ वैमानिकांची पहिली तुकडी येत्या १८ जून रोजी भारतीय वायुदलात सामील करण्यात येईल.
नवी दिल्ली : तीन सैनिकांचा समावेश असलेली महिला लढाऊ वैमानिकांची पहिली तुकडी येत्या १८ जून रोजी भारतीय वायुदलात सामील करण्यात येईल. एअर चीफ मार्शल अरूप राहा यांनी मंगळवारी ही माहिती दिली. तीन महिला प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी या लढाऊ भूमिकेत सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असे राहा यांनी सांगितले.
‘आम्ही १९९१ मध्ये महिलांना वैमानिकाच्या रूपात सामील केले होते. परंतु ते फक्त हेलिकॉप्टर्स आणि परिवहन (विमान) यापुरतेच मर्यादित होते. आता महिलांना लढाऊ वैमानिकाच्या रूपात सामील करण्याच्या भारतीय वायुदलाच्या (आयएएफ) प्रस्तावाला मंजुरी दिल्याबद्दल मी संरक्षण मंत्रालयाचे आभार मानतो. लवकरच म्हणजे १८ जून रोजी वायुसेनेत महिला लढाऊ वैमानिक दिसतील,’ असे राहा म्हणाले.
नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित ‘वुमेन इन आर्म्ड मेडिकल कॉर्प्स’वर आयोजित संमेलनात राहा बोलत होते. यावेळी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर उपस्थित होते. संरक्षण मंत्रालयाने गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये महिलांना लढाऊ वैमानिकाच्या रूपात भारतीय वायुदलात सामील करण्याच्या प्रस्तावाला हिरवा झेंडा दाखवला. हा प्रस्ताव पुढे रेटल्याबद्दल पर्रीकर यांनी राहा यांची प्रशंसा केली.
(लोकमत न्यूज नेटवर्क)