शपथ घेताच मोदी ३.० सरकार ॲक्शन मोडमध्ये, नव्या मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक; काय असेल मोठा निर्णय?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 08:51 AM2024-06-10T08:51:39+5:302024-06-10T08:53:33+5:30
आज मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी (दि.९) तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता मोदी सरकार ३.० सुरू झाले आहे. शपथ घेतल्यानंतर मोदी सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे. आज मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.
आज संध्याकाळी ५ वाजता मोदी मंत्रिमंडळाची बैठक होऊ शकते. याआधी मंत्र्यांच्या खात्याची घोषणा होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी विकसित भारत मिशन आणि मोदींची गॅरंटी लक्षात घेऊन मंत्र्यांना आपले खाते सोपवतील. सर्वांच्या नजरा सीसीएस मंत्र्यांवर आहेत म्हणजेच मोदी सरकारमधील चार प्रमुख मंत्री कोण असतील.
रविवारी मोदी सरकार ३.० चा भव्य शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्याला परदेशी पाहुणे तसेच देशभरातील नामवंत व्यक्तींनी हजेरी लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तिसरा शपथविधी सोहळा सर्वात मोठा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ७२ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये ३० कॅबिनेट मंत्री, ५ स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि ३६ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली.
तेलुगू देसम पार्टी, जदयु, शिंदेसेना, लोकजनशक्ती पार्टीच्या नेत्यांचा त्यासाठीच मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. तसेच, मोदी सरकार ३.० मध्ये सहा माजी मुख्यमंत्र्यांना स्थान देण्यात आले आहे. ज्यामध्ये राजनाथ सिंह तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री बनले आहेत, तर शिवराज सिंह चौहान आणि मनोहर लाल खट्टर पहिल्यांदाच मंत्री झाले आहेत. सर्बानंद सोनोवाल यांनाही मंत्री करण्यात आले आहे. यासोबतच भाजपचे सहयोगी हम पक्षाचे प्रमुख जीतन राम मांझी आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.
'हे' गेल्या सरकारमध्येही होते मंत्री
मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात संधी मिळालेले राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, एस. जयशंकर, निर्मला सीतारमण, हरदीपसिंह पुरी, मनसुख मांडविया, एस. पी. सिंह बघेल, बी. एल. वर्मा, ज्योतिरादित्य सिंधिया, वीरेंद्र कुमार खटीक, जी. किशन रेड्डी, किरेन रिजिजू, जितेंद्र सिंह, गजेंद्र सिंह शेखावत, गिरिराज सिंह, नित्यानंद राय, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, अर्जुनराम मेघवाल हे मागील वेळीही मंत्री होते.
अनेक दिग्गजांचा पत्ता कट
मोदी सरकार ३.०मधून अनेक दिग्गज नेत्यांचा पत्ता कापण्यात आला. त्यात प्रामुख्याने स्मृती इराणी, नारायण राणे, अर्जुन मुंडा, अनुराग ठाकूर, डॉ. भागवत कराड, जनरल व्ही. के. सिंग यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकले नाही.
नितीश कुमार यांनी केले मोदींचे अभिनंदन
नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, सलग तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतल्याबद्दल आदरणीय नरेंद्र मोदीजींचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. माननीय पंतप्रधानांच्या सक्षम नेतृत्वाखाली देश विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचेल आणि बिहारच्या विकासाला पूर्ण सहकार्य मिळेल.
असे आहे मंत्रिमंडळ...
पंतप्रधान : नरेंद्र मोदी.
कॅबिनेट मंत्री : राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, जे. पी. नड्डा, शिवराज सिंह चौहान, निर्मला सीतारमण, एस. जयशंकर, मनोहर लाल खट्टर, एच.डी. कुमारस्वामी, पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, जीतन राम मांझी, राजीव रंजन सिंह, सर्वानंद सोनोवाल, डॉ. वीरेंद्र कुमार, राममोहन नायडू, प्रल्हाद जोशी, जुएल ओराम, गिरीराज सिंह, अश्विनी वैष्णव, ज्योतिरादित्य सिंधिया, भूपेंद्र यादव, गजेंद्रसिंह शेखावत, अन्नपूर्णा देवी, किरेन रिजिजू, हरदीप सिंह पुरी, डॉ. मनसुख मांडविया, जी. किशन रेड्डी, चिराग पासवान, सी. आर. पाटील.
राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) : राव इंद्रजीत सिंह, प्रतापराव जाधव, जितेंद्र सिंह, अर्जुन राम मेघवाल, जयंत चौधरी.
राज्यमंत्री : जितिन प्रसाद, श्रीपाद नाईक, पंकज चौधरी, कृष्णपाल गुर्जर, रामदास आठवले, रामनाथ ठाकूर, नित्यानंद राय, अनुप्रिया पटेल, व्ही. सोमन्ना, चंद्रशेखर पेम्मासानी, एसपी सिंह बघेल, शोभा करंदलाजे, कीर्तिवर्धन सिंह, बनवारीलाल वर्मा, शंतनू ठाकुर, सुरेश गोपी, एल. मुरुगन, अजय टम्टा, बंडी संजय कुमार, कमलेश पासवान, भागीरथ चौधरी, सतीशचंद्र दुबे, संजय सेठ, रवनीत सिंह बिट्टू, दुर्गादास उइके, रक्षा खडसे, सुकांता मजूमदार, सावित्री ठाकूर, तोखन साहू, डॉ. राजभूषण निषाद, श्रीनिवास वर्मा, हर्ष मल्होत्रा, निमुबेन जयंतीभाई बांभानिया, मुरलीधर मोहोळ, जॉर्ज कुरियन, पबित्रा मार्गेरिटा.