अलर्ट! भारतात कोरोनाच्या 'डेल्टा प्लस' व्हेरिअंटचा आणखी एक रुग्ण आढळला, चिंतेत भर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 01:28 PM2021-06-17T13:28:11+5:302021-06-17T13:30:51+5:30
देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आता आणखी एक नवं संकट समोर उभं ठाकलं आहे.
देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आता आणखी एक नवं संकट समोर उभं ठाकलं आहे. आतापर्यंत देश कोरोनाच्या सामान्य व्हेरिअंटचा सामना करत होते. पण आता कोरोनाचं सर्वात घातक रुप समोर आलं आहे. देशात आता कोरोनाच्या डेल्टा प्लस या सर्वात घातक आणि वेगानं पसरणाऱ्या व्हेरिअंटचे रुग्ण आढळू लागले आहेत. मध्यप्रदेशच्या भोपाळ येथे बडखेडा पठानी येथे राहणाऱ्या ६५ वर्षीय वृद्ध महिलेला कोरोनाची लागण झाली असून तिच्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूचं अस्तित्व सापडलं आहे. डेल्टा प्लस हे दुसऱ्या लाटेत कोरोनानं बदललेलं नवं रुप आहे. देशात आतापर्यंत डेल्टा प्लस व्हेअरिंटचे एकूण ६ रुग्ण आढळले आहेत.
अँटिबॉडी कॉकटेलचाही प्रभाव होईना
चिंताजनक बाब अशी की डेल्टा प्लस या व्हेरिअंटवर सध्या कोरोनावर उपचारासाठी वापरण्यात येणारी औषधं कूचकामी ठरत आहेत. त्यामुळे हा नवा व्हेरिअंट अतिशय घातक समजला जात आहे. याशिवाय मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल औषधांचाही या व्हेरिअंटवर काहीच परिणाम होत नसल्याचं दिसून आलं आहे. नुकतंच दोन मोठ्या कंपन्यांनी मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेलच्या औषधांची निर्मिती केली होती आणि कोरोनावरील उपचारांत याचा मोठा फायदा होईल असं सांगण्यात आलं होतं. पण डेल्टा प्लस या व्हेरिअंटवर या अँटीबॉडीचा देखील काहीच परिणाम होत नसल्याचं दिसून आलं आहे.
गांभी मेडिकल कॉलेजमध्ये भोपाळहून या महिन्यात १५ नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. यात एका नमुन्यात कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिअंट सापडला आहे. इतर नमुन्यांमध्ये डेल्टा आणि इतर व्हेरिअंट आहेत. दरम्यान नव्या व्हेरिअंट सापडल्याची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. भोपाळच्या सीएमएचओ डॉ. प्रभाकर जिवारी यांनी अद्याप अहवाल पाहिलेला नाही त्यामुळे काहीच सांगू शकत नाही असं म्हटलं आहे.