Bird Flu : चिंता वाढली! 'या' राज्यात बर्ड फ्लूचा कहर; कावळे आणि कोंबड्यांना मारण्याचे दिले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 12:20 PM2022-04-15T12:20:01+5:302022-04-15T12:29:27+5:30
Bird Flu : पशुसंवर्धन विभागाने याचा तपास केला असून पक्ष्यांचे सँपल घेतले. यामध्ये बर्ड फ्लू असल्याची माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. देशात आणखी एका खतरनाक व्हायरसचा धोका निर्माण झाला असून पक्ष्यांना मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बिहारच्या सुपौलमध्ये बर्ड फ्लूचा कहर पाहायला मिळत आहे. छपकाही गावामध्ये काही दिवसांपासून कावळे आणि कोंबड्यांचा मृत्यू होत आहे. यानंतर आता पशुसंवर्धन विभागाने याचा तपास केला असून पक्ष्यांचे सँपल घेतले. यामध्ये बर्ड फ्लू असल्याची माहिती समोर आली आहे.
पशुसंवर्धन विभागाने गावातील एक किलोमीटर क्षेत्रातील कोंबड्यांना मारण्याचं काम सुरू केलं आहे. जेणेकरून बर्ड फ्लू व्हायरस हा इतर परिसरात पसरू नये. तसेच छपकाही गावाच्या 9 किलोमीटर परिसरात तपास सुरू केला आहे. दोन आठवड्यापासून गावातील वॉर्ड नंबर एक ते 11 मधील कोंबड्या, बदक आणि कावळ्यांचा अचानक मृत्यू होत होता. यामुळे पशुसंवर्धन विभागाच्या एका टीमने गावात येऊन याचा तपास केला. यामध्ये बर्ड फ्लू असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पशुसंवर्धन विभागाच्या आदेशानंतर सुपौलचे डीएम कौशल कुमार आणि एसपी डी अमर्केश यांनी रॅपिड रिस्पॉन्स टीम तयार केल्या आहे. या टीमकडे पक्ष्यांना मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बर्ड फ्लू रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. तसेच घटनास्थळी जाऊन पाहणी केली जात आहे. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी राम शंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या लोकांचे हे पक्षी आहेत त्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.