Corona Vaccine: कोरोनाची पहिली लस कधी, केव्हा अन् कोणाला?; आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

By कुणाल गवाणकर | Published: December 21, 2020 10:06 AM2020-12-21T10:06:01+5:302020-12-21T10:07:35+5:30

Corona Vaccine: कोरोना लसीकरणासाठी प्राधान्यक्रम निश्चित; संपूर्ण देशात प्रशिक्षणाचं काम वेगानं सुरू

first covid 19 vaccine in january 2021 says union health minister dr harsh vardhan | Corona Vaccine: कोरोनाची पहिली लस कधी, केव्हा अन् कोणाला?; आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Corona Vaccine: कोरोनाची पहिली लस कधी, केव्हा अन् कोणाला?; आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Next

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरीही धोका कायम आहे. दिवाळीनंतर कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली होती. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला आहे. मात्र तरीही पुन्हा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे कोरोनाची लस नेमकी कधी उपलब्ध होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याबद्दल केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 




पुढील महिन्याच्या म्हणजेच जानेवारीच्या कोणत्याही आठवड्यात देशात कोरोनाची पहिली लस देण्यात येईल, असं हर्षवर्धन यांनी सांगितलं. लसीच्या दर्जाबद्दल सरकार कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही. नागरिकांना उत्तम दर्जाची लस दिली जाईल. जानेवारीत पहिली लस देण्यात येईल, असं हर्षवर्धन म्हणाले. सध्याच्या घडीला ६ लसींच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत. देशभरात या चाचण्या सुरू आहेत, अशी माहिती याआधी आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.




तज्ज्ञांशी सल्लामसलत करून कोरोना लस प्राधान्यानं कोणाला द्यायची, याबद्दलचा निर्णय घेण्यात आल्याचं डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं. 'देशात ३० कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात येईल. यामध्ये आरोग्य कर्मचारी, पोलीस, सैन्य दलांमधील कर्मचारी, स्वच्छता कामगार, पन्नाशी पार केलेले नागरिक आणि पन्नाशी पार न केलेले मात्र गंभीर आजारांचा सामना करत असलेल्या नागरिकांचा समावेश असेल,' अशी माहिती त्यांनी दिली.




कोरोना लसीकरणासाठी सरकारनं प्राधान्यक्रम निश्चित केलेला आहे. यातील प्रत्येकापर्यंत कोरोना लस पोहोचावी, त्यानं ती लस घ्यावी असा सरकारचा प्रयत्न असेल. मात्र एखाद्यानं लस टोचून न घेण्याचा निर्णय घेतल्यास आम्ही त्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही, असं हर्षवर्धन म्हणाले. 'लसीकरणासाठी राज्य, जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर टास्क फोर्स तयार करण्यात आल्या आहेत. लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण सुरू आहे. आतापर्यंत २६० जिल्ह्यांत २० हजार जणांचं प्रशिक्षण पूर्ण झालं आहे,' अशी आकडेवारी त्यांनी दिली.

Web Title: first covid 19 vaccine in january 2021 says union health minister dr harsh vardhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.