पहिला दिवस इंग्लंडचा! रुटच्या शतकाच्या जोरावर 4 बाद 311 धावा
By admin | Published: November 9, 2016 12:34 PM2016-11-09T12:34:34+5:302016-11-10T04:23:21+5:30
रत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसावर इंग्लंडने वर्चस्व गाजवले.
Next
>
ऑनलाइन लोकमत
राजकोट, दि. 9 - भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसावर इंग्लंडने वर्चस्व गाजवले. जो रूटचे शतक आणि शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या मोईन अलीने केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या दिवसअखेर 4 बाद 311 अशी मजल मारली आहे.
राजकोट कसोटीचा पहिला पहिला दिवस गाजवला तो जो रूट आणि मोईन अलीने. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी 179 धावांची भागीदारी करत इंग्लंडला सुस्थितीत पोहोचवले. दरम्यान, रूटने आपले शतकही पूर्ण केले. दिवसाचा खेळ संपण्यासाठी काही वेळ शिल्लक असताना उमेश यादवने रूटला (124) स्वत:च्याच गोलंदाजीवर टिपले. त्यानंतर मोईन अली (खेळत आहे 99) आणि बेन स्टोक्स (खेळत आहे 13) यांनी भारताला अजून यश मिळू न देता इंग्लंडला 311 धावांपर्यंत मजल मारून दिली. पहिल्या दिवसाच्या खेळात भारताची गोलंदाजी पूर्णपणे निष्प्रभ ठरली.
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यावर सावध सुरुवात करणाऱ्या इंग्लंडची भारताच्या फिरकी माऱ्यासमोर घसरगुंडी उडाली. अश्विन आणि जडेजाच्या फिरकीने तीन इंग्लिश फलंदाजांना परतीची वाट दाखवल्याने उपाहारावेळी इंग्लंडची अवस्था 3 बाद 102 अशी झाली होती.
इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरूवात झाली असून पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार अॅलिस्टर कूक आणि पदार्पणवीर हसीब हामीद यांनी इंग्लंडच्या डावाला सावध सुरुवात करून दिली. मात्र भारताच्या फिरकी गोलंदाजांनी मोर्चा सांभाळल्यावर कूक (21) तर हामीद (31) धावा काढून माघारी परतले. त्यापाठोपाठ उपाहारापूर्वी डुकेटचे (13) परतीचे तिकीट कापत अश्विनने इंग्लंडला तिसरा धक्का दिला.
त्यानंतर जो रूटने मोईन अलीसोबत दमदार भागीदारी करत राजकोट कसोटीत इंग्लंडचा डाव सावरला. त्यानंतर या दोघांच्या अभेद्य भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने चहापानापर्यंत तीन बाद 209 धावांपर्यंत मजल मारली होती. वेस्ट इंडीज आणि न्यूझीलंडविरुद्ध सलग दोन मालिका जिंकल्यामुळे भारताचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. त्यामुळे इंग्लंडला मात देता आपले अव्वलस्थान बळकट करण्यावर भारताची नजर आहे.
धावफलक
इंग्लंड (पहिला डाव) : अॅलिस्टर कूक पायचीत गो. जडेजा २१, हसीब हमीद पायचीत गो. अश्विन ३१, ज्यो रुट झे. आणि गो. यादव १२४, बेन डकेट झे. रहाणे गो. आश्विन १३, मोईन अली नाबाद ९९, बेन स्टोक्स नाबाद १९, अवांतर : ४, एकूण : ९३ षटकांत ४ बाद ३११ धावा. गडी बाद क्रम : १/४७, २/७६, ३/१०२, ४/२८१. गोलंदाजी : शमी १२.१-२-३१-०, यादव १८.५-१-६८-१, आश्विन ३१-३-१०८-२, जडेजा २१-२-५९-१, मिश्रा १०-१-४२-०.
इंग्लंड (पहिला डाव) : अॅलिस्टर कूक पायचीत गो. जडेजा २१, हसीब हमीद पायचीत गो. अश्विन ३१, ज्यो रुट झे. आणि गो. यादव १२४, बेन डकेट झे. रहाणे गो. आश्विन १३, मोईन अली नाबाद ९९, बेन स्टोक्स नाबाद १९, अवांतर : ४, एकूण : ९३ षटकांत ४ बाद ३११ धावा. गडी बाद क्रम : १/४७, २/७६, ३/१०२, ४/२८१. गोलंदाजी : शमी १२.१-२-३१-०, यादव १८.५-१-६८-१, आश्विन ३१-३-१०८-२, जडेजा २१-२-५९-१, मिश्रा १०-१-४२-०.
झेल सोडल्याचा फटका बसला : बांगर
इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कूक आणि पदार्पण करणारा सलामीवीर हसीब हमीद यांचा पहिल्या तासाच्या खेळात झेल सोडून भारतीय संघाने मधल्या फळीला लक्ष्य बनविण्याची संधी गमविली, अशी कबुली भारतीय संघाचे फलंदाजी कोच संजय बांगर यांनी पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर दिली.
बांगर म्हणाले, की पहिल्या सत्रात अधिक गडी बाद करण्याचा लाभ होतो. गोलंदाजी असो वा फलंदाजी, पहिल्या तासाचा नेहमी लाभ घ्यायलाच हवा. आमच्या क्षेत्ररक्षकांनी काही झेल सोडल्यामुळे फटका सहन करावा लागला. अजिंक्य रहाणे आणि मुरली विजय यांनी झेल सोडल्यामुळे नंतर खेळावर पकड निर्माण करता आली नाही. चांगली सुरुवात झाली असती, तर इंग्लंडला कोंडीत पकडू शकलो असतोे.