अधिवेशनाचा ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ तणावात
By admin | Published: February 24, 2016 02:47 AM2016-02-24T02:47:29+5:302016-02-24T02:47:29+5:30
संसदेच्या बजेट सत्राचा मंगळवारी होता फर्स्ट डे फर्स्ट शो. खासदारांच्या उपस्थितीने तुडुंब भरलेल्या सेंट्रल हॉलमधे राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात झाली.
- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
संसदेच्या बजेट सत्राचा मंगळवारी होता फर्स्ट डे फर्स्ट शो. खासदारांच्या उपस्थितीने तुडुंब भरलेल्या सेंट्रल हॉलमधे राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात झाली. सव्वा तासांच्या प्रदीर्घ अभिभाषणात राष्ट्रपतींनी सरकारच्या जन धन योजनेपासून, २0२२ पर्यंत सर्वांना घरकुले, २0१८ पर्यंत प्रत्येक गावात वीज, वन रँक वन पेन्शन, महत्वाकांक्षी पीक विमा योजनेसह ठळक योजनांचा विस्ताराने आढावा घेतला. अभिभाषणात जुन्याच घोषणांची उजळणी अधिक होती. फारसे नवे मुद्दे नव्हते.
अभिभाषणात महत्वाकांक्षी योजनांचा उल्लेख होत असताना सत्ताधारी सदस्य बाके वाजवून स्वागत करीत होते. लोकसभा टीव्ही कॅमेऱ्याचा फोकस अशा वेळी संबंधित मंत्र्यांच्या दिशेने वळत असे. आपले चेहरे हसरे ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न यावेळी अनेक केंद्रीय मंत्री करीत होते.
यंदाचे बजेट अधिवेशन वादळी ठरणार याविषयी कोणालाही शंका नाही. जेएनयू प्रकरण, रोहित वेमुलाची आत्महत्या, जाटांचे आरक्षण आंदोलन अशा कारणांमुळे संसदेबाहेर तणावाचे वातावरण आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत मोदी सरकारवर चौफेर हल्ला चढवीत सोनिया गांधी म्हणाल्या की, सत्ताधारी पक्षाचे भान पूर्णत: हरवले आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
मोदींच्या चेहऱ्यावर तणाव..
1) संसदेच्या प्रांगणात पत्रकारांशी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही विरोधी पक्षांच्या सकारात्मक भूमिकेचा प्रथमच हवाला देत, जनतेच्या आकांक्षा आणि अपेक्षांनुसार बजेट सत्रात उभय सभागृहांचा वापर गहन चर्चा व विचार विनिमयासाठीच होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
2) बोलतांना मोदींंच्या चेहऱ्यावर नेहमीचा उत्साही नूर अथवा आत्मविश्वास मात्र दिसला नाही.
3) संसदेत गदारोळ होण्यासाठी अनेक विषय सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांनीच यंदाही पुरवले आहेत. त्याचा स्पष्ट तणाव पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्यावर सकाळपासून जाणवत होता.