कोरोनाच्या महासाथीनंतर H3N2 चं संकट, कर्नाटकात पहिल्या मृत्यूची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 11:31 AM2023-03-10T11:31:22+5:302023-03-10T11:32:25+5:30
राज्याचे आरोग्य विभागाचे आयुक्त रणदीप यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
H3N2 Virus : H3N2 (इन्फ्लुएंझा व्हायरस) विषाणूमुळे मृत्यूची पहिली घटना कर्नाटकमध्ये नोंदवली गेली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील हासन जिल्ह्यात H3N2 विषाणूमुळे एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. राज्याचे आरोग्य विभागाचे आयुक्त रणदीप यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
ताप, सर्दी आणि घशाच्या समस्येनं त्रस्त असलेल्या ८५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. टीव्ही ९ नं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. राज्यातील जिल्ह्यांमध्ये H3N2 विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. राज्यात ५० हून अधिक रुग्णांची नोंदही करण्यात आली आहे. यामध्ये हासनमधील सहा जणांना H3N2 विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. दरम्यान, आरोग्य विभागानं ६० वर्षांवरील लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी पावलं उचलली आहेत. त्याचबरोबर या पहिल्या मृत्यूची चौकशी करण्याबाबत आयुक्त रणदीप यांनी सांगितलं आहे.
१ मार्चला व्यक्तीचा मृत्यू
हासन जिल्ह्यातील अलूर येथे १ मार्च रोजी वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यांना खोकला, घसादुखी आदी त्रास होत होता. आता खबरदारीचा उपाय म्हणून मृत व्यक्तीच्या संपर्कातील लोक आणि गावातील व्यक्तींची तपासणी केली जात आहे. सर्वांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली असून घशातील स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO) डॉ. शिवस्वामी यांनी दिली आहे.
कोरोनाच्या महासाथीनंतर आता H3N2 व्हायरसनं चिंता वाढवली आहे. आधीच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये H3N2 विषाणूच्या संसर्गात वाढ झाली आहे. आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय बैठक घेतल्यानंतर राज्य सरकारने विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.