हाथरस सत्संग घटनेत १२१ भाविकांचा मृत्यू; पोलिसांच्या FIR मध्ये प्रवचन देणाऱ्या 'भोले बाबा'चे नावच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 09:15 AM2024-07-03T09:15:46+5:302024-07-03T09:16:15+5:30

Hathras Stampede News: हाथरसमध्ये एका कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये १२१ जणांचा मृत्यू झाला आहे.

First FIR in Hathras Satsang case but Bhole Baba name is not there main sevadar is named | हाथरस सत्संग घटनेत १२१ भाविकांचा मृत्यू; पोलिसांच्या FIR मध्ये प्रवचन देणाऱ्या 'भोले बाबा'चे नावच नाही

हाथरस सत्संग घटनेत १२१ भाविकांचा मृत्यू; पोलिसांच्या FIR मध्ये प्रवचन देणाऱ्या 'भोले बाबा'चे नावच नाही

Hathras Stampede :उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये मंगळवारी एका सत्संगच्या कार्यक्रमात तब्बल १२१ भाविकांचा मृत्यू झाला. त ३० जण अद्याप गंभीर जखमी आहेत. सूरजपाल उर्फ ​​भोले बाबा याच्या सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली. ही चेंगराचेंगरी इतकी होती की काही वेळातच मृतदेहांचा ढीग पडला होता. भोले बाबांचे प्रवचन ऐकण्यासाठी सर्वजण सत्संगाला आले होते. या प्रकरणाचा आता पोलीस कसून तपास करत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य सेवेदार देव प्रकाश आणि अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. मात्र आता पोलिसांच्या या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण त्या एफआयआरमध्ये प्रवचन देणाऱ्या भोले बाबाचेच नाव नाही. 

हाथरस येथे सत्संगाच्या वेळी झालेल्या मृत्यू तांडवाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. वरिष्ठांच्या आदेशानंतर पोलीस या प्रकरणाचा वेगाने तपास करत असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी भोले बाबाचे मुख्य सेवक म्हणून ओळखले जाणारे देवप्रकाश मधुकर याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ च्या कलम १०५, ११०, १२६ (२), २२३ आणि २३८ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये भोले बाबाचे नावच नाही. पोलिसांच्या कारवाईत भोले बाबाचे नाव नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

 हाथरसच्या सिकंदरराव पोलीस ठाण्यात रात्री १०:१८ मिनिटांनी हा एफआयआर नोंदवण्यात आला. ब्रजेश पांडे नावाच्या व्यक्तीने हा एफआयआर दाखल केला आहे. मुख्य सेवेदार देवप्रकाश याच्या विरोधात हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे, भोले बाबाचे नावाचे एफआयआरमध्ये नसल्याने या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोक सेवेदारांच्या मागे जात नाहीत, भोले बाबामुळे लोक तिथे आले. भोले बाबाला मुख्य आरोपी मानले पाहिजे," असे मृतांच्या कुटुंबियांचे म्हणणं आहे.

दरम्यान, या कार्यक्रमाची प्रशासनाकडून परवानगी घेण्यात आली होती. मात्र आयोजकांकडून केवळ ८० हजार लोक येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार प्रशासनाने कार्यक्रमस्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र कार्यक्रमाच्या दिवशी अडीच लाखांहून अधिक भाविक सत्संगसाठी आले होते. त्यानंतरही आयोजकांनी भाविकांची संख्या पोलिसांपासून लपवून ठेवली. मात्र सकाळपासूनच कार्यक्रमाचे सुरु असताना अडीच लाख लोकांची गर्दी पोलिसांना कशी दिसली नाही असाही सवाल आता केला जात आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार प्रभारी मंत्री असीम अरुण मंगळवारी रात्री उशिरा हाछरसला पोहोचले. त्यांनी हाथरसच्या जिल्हा रुग्णालयात जखमींची भेट घेतली. "या प्रकरणात कोणालाही सोडले जाणार नाही. कोणत्याही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही, असे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करण्यात आली आहे. ज्याची चौकशी करून २४ तासांत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अहवाल सादर करायचा आहे," असे मंत्री असीम अरुण यांनी सांगितले. 

Web Title: First FIR in Hathras Satsang case but Bhole Baba name is not there main sevadar is named

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.