पहिलीतील मुलीचा मगरीशी संघर्ष
By admin | Published: April 7, 2017 04:57 AM2017-04-07T04:57:51+5:302017-04-07T04:57:51+5:30
सहा वर्षांच्या मुलीने चक्क मगरीशी दोन हात करून मैत्रिणीची मृत्यूच्या जबड्यातून सुखरूप सुटका केल्याची घटना ओडिशाच्या दुर्गम गावात घडली
केंद्रपाडा : सहा वर्षांच्या मुलीने चक्क मगरीशी दोन हात करून मैत्रिणीची मृत्यूच्या जबड्यातून सुखरूप सुटका केल्याची घटना ओडिशाच्या दुर्गम गावात घडली. केंद्रपाडा जिल्ह्यातील जंगलात मोठ्या प्रमाणात मगरींचे वास्तव्य आहे. त्यामुळे जंगलाजवळील परिसर धोकादायक मानला जातो. बंकुआला गाव जंगलाजवळच आहे. या गावातील बच्चेकंपनी स्नानासाठी नजीकच्या तलावावर जाते. बसंती दलाई आणि टिकी दलाई या पहिलीच्या विद्यार्थिनी मंगळवारी नेहमीप्रमाणे तलावावर गेल्या होत्या.
त्या स्नान करीत असताना त्यांना पाण्यात काहीतरी हालचाल सुरू असल्याचे जाणवले. मात्र, त्यांना काही कळायच्या आत मगरीने बसंतीवर हल्ला केला. तेव्हा इवल्याशा टिकीने घाबरून न जाता मगरीशी दोन हात केले. तिने बांबूच्या काठीने मगरीच्या डोक्यावर वार केला. त्यामुळे विचलित झालेली मगर बसंतीला सोडून पाण्यात निघून गेली. मुलींचा आरडाओरडा ऐकून ग्रामस्थ तलावावर आले. त्यांनी जखमी बसंतीला उपचारासाठी रुग्णालयात नेले. बसंतीच्या डोक्याला तसेच जांघेला इजा झाल्याचे समजते. मगरीच्या तावडीतून बसंतीची सुटका केल्याबद्दल ग्रामस्थांनी तिची वर्गमैत्रीण टिकीचे आभार मानले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, वन विभाग मगरीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीच्या उपचाराचा खर्च पेलण्यासह मुलीला नुकसानभरपाई देईल.